Sun, Jan 20, 2019 06:40होमपेज › Belgaon › राज्यात राष्ट्रवादी दहा जागा लढविणार 

राज्यात राष्ट्रवादी दहा जागा लढविणार 

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 15 2018 11:19PMबंगळूर : प्रतिनिधी    

आगामी विधानसभा निडवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील वातावरण तापू लागले असून सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून आणि इच्छुकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकाच्या राजकारणात उतरणार असून एकूण सात जागांवर उमेदवार उभे करणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि निजदचे प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांच्यात मुंबई येथे यासंदर्भात बैठक झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस, निजद आणि बहुजन समाजवादी पार्टी या तिघांनी मिळून संयुक्तरित्या  कर्नाटकात निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निधर्मी जनता दलाचे माजी मंत्री पी. जी. आर. शिंदिया यांनी पुढाकार घेतला आहे. 

कर्नाटका-मध्ये तिसरी शक्ती म्हणून हे तिन्ही पक्ष निडवणुकीला सामोरे जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सात ते दहा जागा देण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस विशेष करुन बेळगाव, विजापूर आणि उत्तर कर्नाटकातील जागा लढविणार आहे. उर्वरित मतदार संघातील प्रचारासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, बहुजन समाजवादी पक्षाच्या मायावती, निधर्मी जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. याशिवाय या तिसर्‍या शक्तीला पाठबळ देण्यासाठी कम्युनिस्ट पार्टी आणि तृणमूल काँग्रेसही प्रचारात भाग घेणार आहे. 

उत्तर कर्नाटक आणि मुंबई कर्नाटक या भागामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीमध्ये उतरणार आहे. यामुळे काँग्रेस पक्षाची डोकेदुखी वाढणार आहे. राष्ट्रवादी पक्ष, बहुजन समाजपक्ष आणि निधर्मी जनता दल या पक्षांची मदारही प्रामुख्याने मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक मतांवर राहिलेली आहे. पहिल्यांदाच कर्नाटकात या तिन्ही पक्षांमध्ये युती होत असल्याने याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

उ. कर्नाटकामध्ये मराठा समाजाचे प्राबल्य

कर्नाटकात मराठा समाजाची मते आतापर्यंत निर्णायक ठरत आली आहेत. शरद पवार यांचा केंद्रासह विविध राज्यांमध्ये सातत्याने प्रभाव राहिलेला आहे. कर्नाटकातील मराठा समाज शरद पवारांना मानणारा आहे. उत्तर कर्नाटकामध्ये मराठा समाजाचे प्राबल्य आहे. सीमाभाग वगळता राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. निजद आणि बहुजन पक्षाने राष्ट्रवादीलाच मतदार संघ निवडण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजपबरोबरच या तिसर्‍या शक्तीमध्ये चुरस निर्माण होणार आहे.