Mon, Jul 15, 2019 23:43होमपेज › Belgaon › राजकीय वर्चस्व विरुद्ध राष्ट्रीय वर्चस्व

राजकीय वर्चस्व विरुद्ध राष्ट्रीय वर्चस्व

Published On: May 11 2018 1:11AM | Last Updated: May 10 2018 9:25PMबेळगाव : प्रतिनिधी

परंपरागत राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जाणार्‍या हुक्केरी व जोल्ले यांच्यामध्ये चिकोडी-सदलगा मतदारसंघातील निवडणूक रंगणार आहे. या थेट लढतीत चिकोडीवर वर्चस्व कोणाचे याचा फैसला होणार आहे. खा. प्रकाश हुक्केरी यांचे राजकीय वर्चस्व जिंकणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय वर्चस्व जिंकणार याकडे सार्‍या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.राज्यातील राजकारणात बडी हस्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या  खा. प्रकाश हुक्केरी यांचा मतदारसंघ म्हणून चिकोडी-सदलगा मतदारसंघ ओळखला  जातो.  हुक्केरी पितापुत्रांना घेरण्यासाठी भाजपने यावेळी व्यूहरचना केली आहे. काँग्रेसतर्फे आ. गणेश हुक्केरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपतर्फे सहकारनेते अण्णासाहेब जोल्ले  निवडणूक रिंगणात आहेत. या दोघामध्ये काँटे की टक्‍कर रंगणार आहे.

या मतदारसंघाने सातत्याने काँग्रेसला साथ दिली आहे. या मतदारसंघातूनच खा. प्रकाश हुक्केरी यांनी राजकारणात आपला दबदबा निर्माण केला. मतदारांशी त्यांचा थेट संपर्क आहे. त्या जोरावर आ. गणेश हुक्केरी यांना त्यांनी राज्याच्या राजकारणात आणले आहे.  यावेळी याठिकाणी हुक्केरी आणि जोल्ले यांच्यामध्ये काँटे की टक्‍कर होत आहे. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सभा घेतल्या आहेत. यामुळे मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले असून विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालते, याबाबत मतदारामध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

हुक्केरी पिता-पुत्रांना टक्‍कर देण्यासाठी भाजपने यावेळी सहकारनेते जोल्ले यांना चांगले पाठबळ दिले आहे. 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णासाहेब जोल्ले यांना प्रकाश हुक्केरी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. हुक्केरी यांची मतदारसंघावर चांगलीच पक्‍कड आहे. त्यांनी केलेल्या विकासकामाच्या जोरावर काँग्रेसला मतदारांकडून पसंदी देण्यात येईल, असा दावा करण्यात येत आहे. आ. गणेश हुक्केरी यांनीदेखील अल्पावधीत आपल्या कामाचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. 

जोल्ले यांची सारी भिस्त भाजपचे परंपरागत मतदारावर आहे. त्याचबरोबर त्यांनी तालुक्यात सहकाराचे चांगलेच जाळे विणले आहे. त्या जोरावर विजय खेचून आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. परिणामी आ. गणेश हुक्केरी व अण्णासाहेब जोल्ले अशी थेट लढत रंगणार आहे.या दोन उमेदवारांना टक्‍कर देण्यासाठी बसपचा उमेदवार याठिकाणी आहे. राजू कांबळे यांनी दोन मातब्बर उमेदवाराविरोधात दंड थोपटले आहे. त्यांना मतदार कितपत पसंती देतात, यावर हुक्केरी यांचे विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. बसपने दलित मतावर डल्ला मारल्यास काँग्रेसच्या मतामध्ये घट होण्याची शक्यता आहे. यामुळे हुक्केरी यांना अधिक सावध राहावे लागणार आहे. तर जोल्ले यांनादेखील निवडणूक सोपी नसून विजयासाठी घाम गाळावा  लागणार आहे.