Thu, Apr 25, 2019 17:33होमपेज › Belgaon › नरेंद्र मोदी ‘वर्क मोड’वर कधीच नसतात : राहुल

नरेंद्र मोदी ‘वर्क मोड’वर कधीच नसतात : राहुल

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 1:48AMबंगळूर : वृत्तसंस्था

‘मोबाईल फोनमध्ये तीन मोड असतात. वर्क मोड, स्पीकर मोड आणि एअरप्लेन मोड. मोदी यातील स्पीकर आणि एअरप्लेन मोड हे दोनच मोड वापरतात. ‘वर्क मोड’चा वापर ते कधी करतच नाहीत’, अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदींवर उपहासात्मक शैलीत टीका केली. बंगळूर ग्रामीण भागात सोमवारी प्रचारासाठी आले असता त्यांनी मोदी यांच्या कार्यपद्धतीचा खरपूस समाचार घेतला.

कर्नाटकामध्ये 12 रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीला चारच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने येथील वातावरण ढवळून निघाले आहे.
कर्नाटकात येडियुराप्पा यांचे सरकार सर्वात भ्रष्ट सरकार होते. त्यांच्याच काळात कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली होती. येडियुराप्पा यांनी काय केले? हे कर्नाटकमधील जनता जाणते. ते कितीदा तुरुंगात गेले त्यांची पात्रता काय आहे, हे देखील मोदींनी सांगावे, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानाबाबत पंतप्रधान मोदी नेहमीच बोलतात. मात्र, जे बाबासाहेबांनी लिहिले त्याविरोधातच ते काम करत असतात. बिहार, यूपी, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दलितांवर हल्ले होत असताना आणि त्यांचे मंत्री घटना बदलणार, असे म्हणतात. तरीही मोदी यावर मात्र काहीच बोलत नाहीत. देशाच्या घटनेला नरेंद्र मोदी, आरएसएस किंवा भाजप स्पर्शही करू शकणार नाहीत. याचे कारण म्हणजे काँग्रेस यासाठी सर्वात पुढे उभी राहील आणि एक इंचदेखील मागे हटणार नाही, अशा शब्दांत राहुल यांनी मोदी, भाजप आणि आरएसएसवर प्रहार केला.

...ते काय भले करणार? : शहा

भाजपचे नेते अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती शब्दांत टीका केली. ‘ज्या व्यक्‍तीकडे वंदे मातरम्वेळी उभे राहण्यासाठी वेळ नाही, ते या देशाचे काय भले करणार?’, असा सवाल शहा यांनी केला.