होमपेज › Belgaon › चारही हत्यांचा सूत्रधार एकच?

चारही हत्यांचा सूत्रधार एकच?

Published On: Jun 20 2018 2:29AM | Last Updated: Jun 20 2018 2:29AMबंगळूर : प्रतिनिधी

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्यासह डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही हत्यांचा सूत्रधार एकच असल्याची माहिती पुढे येत आहे. लंकेश हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या सहा संशयितांची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) कसून चौकशी सुरू असून, त्यातून ही माहिती हाती लागल्याचे सूत्रांकडून समजते.

चारही हत्यांमध्ये साम्य म्हणजे या विचारवंतांवर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तसेच कॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि गौरी यांची हत्या एकाच पिस्तुलाने झाल्याचे निष्पन्‍न झाले आहे. त्यामुळे सूत्रधारही एकच असावा, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे.

परशुराम वाघमारे, अमोल काळे या संशयितांच्या डायरीत सांकेतिक भाषेत (कोड वर्ड) काही माहिती मिळाली आहे. त्यानुसार या चारही हत्यांमागे एकच सूत्रधार असल्याच्या दिशेने तपास सुरू झाला आहे. अमोल काळेच्या डायरीत मराठी भाषेत काही नोंदी आहेत. त्यांचा अर्थ लावण्याचे काम सुरू आहे.

तपास अंतिम टप्प्यात आला आहे. हत्येमागील सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात लवकरच यश मिळणार असल्याचा विश्‍वास एसआयटीला (विशेष तपास पथक) आहे. तोपर्यंत संशयितांना कोणाच्याही ताब्यात देता येणार नाही, अशी भूमिका कर्नाटक एसआयटीने घेतली आहे. तशी विनंतीही न्यायालयाकडे करण्यात आली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रातील एसआयटी आणि सीबीआय अधिकारी कर्नाटक एसआयटीच्या संपर्कात आहेत. डायरीतील माहितीच्या प्रती त्यांनी घेतल्या आहेत. शिवाय, सीबीआयने संशयितांना आपल्या ताब्यात घेण्याची तयारी चालविली आहे. 

सरकारी वकिलांनी या आरोपावर आक्षेप घेतला आहे. याआधी चारवेळा संशयितांना एपीएमएम न्यायालयात हजर केले, त्यावेळी कोणत्याही संशयिताने पोलिसांकडून मारहाण झाल्याची तक्रार केली नसल्याचे सांगितले. त्यावर खंडपीठाने याची शहानिशा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. कनिष्ठ न्यायालयाने याविषयी पुरावे सादर करण्याची सूचना खंडपीठाने दिली.