Tue, Jun 18, 2019 22:26होमपेज › Belgaon › शिवद्वेष्ट्या नारायणगौडांचा निषेध

शिवद्वेष्ट्या नारायणगौडांचा निषेध

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 06 2018 10:58PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

करवेचा तथाकथित म्होरक्या नारायणगौडा यांनी शिवाजी महाराज की जय म्हणण्यास बंदी घालण्यात यावी, असे विवादास्पद वक्तव्य करून मराठी माणसांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सरकारने त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने केली. 

मध्यवर्ती म. ए. समिती व तालुका म. ए. समितीची बैठक शनिवारी मराठा मंदिरमध्ये आयोजित करण्यात आली होती. दोन्ही बैठकीत नारायणगौडाच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर म. ए. समितीतर्फे जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांना सोमवार दि, 8 रोजी सकाळी अकरा वा. निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी उपरोक्त ठराव मांडला. यावेळी अष्टेकर यांनी नारायणगौडाच्या वक्तव्यामुळे समस्त मराठी भाषिक जनता आणि मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष असून त्यांचा द्वेष नारायणगौडाने केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. अध्यक्षस्थानी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी होते.

तालुका म. ए. समितीच्या बैठकीत कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर म्हणाले, नारायणगौडांनी यांनी शिवाजी महाराजासंदर्भात विवादास्पद वक्तव्य करून दोन भाषिकांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजी महाराज हे समस्त भारतीयांचे आराध्य दैवत आहे. कर्नाटक सरकार त्यांची जयंती सरकारी पातळीवर साजरी करते. अशा राष्ट्रपुरुषांचा अवमान जनता खपवून घेणार नाही. त्यामुळे सरकारने नारायणगौडांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली.अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष निंगोजी हुद्दार होते.

यावेळी उपस्थितांनीही त्यांचा निषेध व्यक्त केला. नारायणगौडा यांच्यावर कारवाई कण्यात यावी या मागणीसाठी मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस आयुक्तांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.