Wed, Jul 24, 2019 12:59होमपेज › Belgaon › तंत्रज्ञानाच्या युगात जुन्या रुढी, परंपरा जिवंत : प्रशासनानेही द्यावे लक्ष

सांग सांग  भोलानाथ, पाऊस पडेल काय...!

Published On: May 31 2018 1:35AM | Last Updated: May 30 2018 8:38PMबेळगाव: प्रतिनिधी

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग असतानाही लोप पावत चाललेली नंदी-बैलाची गुबुृ-गुबु आजही ग्रामीण भागात जिवंत असल्याचे बघायला मिळत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात जुन्या रुढी, परंपरा जिवंत असल्याचे यातून दिसत आहे.

भल्या मोठ्या आकाराचा पांढरा शुभ्र रंग, पायात व मानेवर घुंगराची माळ, अंगावर  मोठी शाल, जाडदार  शिंग, कपाळावर बाशिंग अशी नंदी बैलाची ओळख होती. आज अशा प्रकारचा नंदीबैल दिसणे दुर्मीळ झाले आहे. योगायोगाने असा नंदी बेळगाव तालुक्यातील पश्‍चिम भागात फिरून सर्वांचेच मनोरंजन करीत आहे. त्याला पाहण्यासाठी बालगोपाल मोठी गर्दी करीत आहेत.

महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातून लोकांचे मनोरंजन करण्यासाठी नंदी व त्याचे मालक आले आहेत. पश्‍चिम भागातील बिजगर्णी, कावळेवाडी, जानेवाडी आदी गावात ते फिरत आहेत. त्यानंतर ते चंदगड तालुक्यात जाणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती परिसरातही त्यांनी आपले खेळ दाखविले आहेत. नंदीने दाखविलेल्या वेगवेगळ्या खेळामुळे लहान मुलांचेही मनोरंजन होत आहे. 

नंदी गावात आला की घरोघरी जायचा व त्याचा मालक ढोल वाजवून सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का, असा गंमतशीर प्रश्‍न नंदीला विचारत होता. त्यावर नंदी होकारात्मक मान हलवून होय असे उत्तर देत होता. घरातील सुवासिनी महिलांकडूनही नंदीची पूजा केली जात होती. 

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात बर्‍याच गोष्टी हद्दपार होताना दिसत आहेत. परंतु ग्रामीण भागात बर्‍याच प्रथा आजही जिवंत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात शेतकर्‍यांकडून मशागतीसाठी बैलांचा वापर केला जातो. मात्र, इतर ठिकाणीही  बैलाचा चांगला उपयोग होत आहे. शहरातील लोकांना माहिती नसलेला नंदी काही वर्षांनी ग्रामीण भागातून हद्दपार होणार का? अशा भितीचा सूर नागरिकांतून ऐकायला मिळत आहे. नंदीच्या मालकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी गावोगावी फिरत मैलोनमैल अंतर कापत बैलाच्या सहाय्याने संसाराचा गाडा हाकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

“घरोघरी जाऊन आम्ही नंदीबैलाचे खेळ दाखवतो. लहान मुलांचे मनोरंजन होते. शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे.  सध्या बेळगाव तालुक्याच्या पश्‍चिम भागात आहे. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात खेळ करणार आहोत. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती भागातील लोकांचेही मनोरंजन केले आहे.  -जोशी महाराज. नंदीचे मालक, पुणे