होमपेज › Belgaon › दांडेलीत माजी नगराध्यक्षांचा खून, बेळगावात निदर्शने

दांडेलीत माजी नगराध्यक्षांचा खून, बेळगावात निदर्शने

Published On: Jul 29 2018 1:20AM | Last Updated: Jul 29 2018 12:31AMदांडेली : वार्ताहर

दांडेलीचे माजी नगराध्यक्ष. वकील संघटनेचे अध्यक्ष आणि दांडेली तालुका विकास आंदोलन समितीचे माजी अध्यक्ष अजित एम. नाईक यांचा खून झाला आहे. त्या खुनाचे पडसाद बेळगाव आणि खानापुरातही उमटले असून, वकिलांनी न्यायालयीन कामावर बहिष्कार टाकून आंदोलन केले.

शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अ‍ॅड. नाईक यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्यांचा त्यांच्या कार्यालयासमोरच खून केला. 

अ‍ॅड. नाईक यांचे जेएनरोड मार्केट भागात कार्यालय आहे. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास कार्यालय बंद करून ते खाली येत असताना मारेकर्‍याने पायरीवरच त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर ते रस्त्यावर आले असताना लोकांसमोरच त्यांच्या छातीवर, पोटावर, गळ्यावर आणि डोक्यावर तलवारीने सपासप वार केले. जबर हल्ल्यामुळे ते रस्त्यावरच कोसळले. त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सीपीआय मुजावर आणि पीएसआय यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन तक्रार नोंद केली. तपास सुरू झाला आहे.

दांडेली बंद

अ‍ॅड. नाईक यांच्या खुनाच्या निषेधार्थ दांडेली वकील संघटना,  दांडेली ब्लॉक काँग्रेस आणि दांडेली तालुका अभिवृध्दी आंदोलन समितीने शनिवारी पुकारलेला बंद शांततेत पार पडला. शनिवारी दांडेलीतील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, खासगी शिक्षण संस्था, सर्व दुकाने, हॉटेल्स् बंद ठेवण्यात आली होते. बस वाहतूक आणि वडाप सुरू होते. 

अ‍ॅड. नाईक यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी करून सकाळी 10 वा. नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर नगराध्यक्ष एन. जे. साळुंके, हल्याळचे नगराध्यक्ष शंकर बेळगावकर, दांडेलीचे तहसीलदार श्रीशैल परमानंद, यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रुद्रभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अ‍ॅड. अजित नाईक हे गेल्या 25 वर्षांपासून दांडेलीत वकिली करीत होते. ते नाडवरे समाजाचे संस्थापक अध्यक्ष होते. दोन दिवसापूर्वीच काही व्यक्तींबरोबर त्यांचा वाद झाला होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.

बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

 बेळगाव : प्रतिनिधी

दांडेली बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अजित नाईक यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बेळगाव जिल्ह्यातील वकिलांनी काम बंद पुकारुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तात्काळ तपास करुन संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व बेळगाव बार आसोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. एस. किवडसन्नावर यांनी केले. 

जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अ‍ॅड. अजित नाईक यांचा खून केलेले हल्लेखोर सापडलेले नाहीत. हे पोलिस दलाचे अपयश आहे. तपास जलदगतींने करुन संबंधितावर कडक कारवाई करण्यात यावी.अलिकडच्या काळात वकीलावर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत योग्य ती कारवाई करावी.

वकिलांना आपली सेवा देणे अवघड बनत चालले आहे. यासाठी वकिलांना संऱक्षण देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान आज दिवसभर वकिलानी न्यायालयीन कामकाजामध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळे पक्षकार आणि वकील दिवसभर बसूृन होते.

आंदोलनामध्ये उपाध्यक्ष मुरगेंद्र पाटील, हणमंत कोंगोळी, प्रवीण अगसगी, शेखर जनमट्टी, बसवराज मदगौडर, बसवराज कोलीन, प्रभाकर पवार, संतोष कुडची, सुभाष देसाई, श्रीमती गिरीजा काननोडी आदी सहभागी झाले होते.