Wed, Aug 21, 2019 03:06होमपेज › Belgaon › बालकचोर समजून युवकाची हत्या

बालकचोर समजून युवकाची हत्या

Published On: May 25 2018 1:08AM | Last Updated: May 24 2018 11:47PMबंगळूर : प्रतिनिधी

कामाच्या शोधात आलेल्या युवकाला बालकचोर समजून जमावाने हल्‍ला करून ठार मारल्याची घटना चामराजपेठमधील अंजनप्पा गार्डननजीक घडल्याचे गुरुवारी उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी जमावावर गुन्हा दाखल केला असून, नऊजणांना अटक केली आहे. बुधवारी हा प्रकार घडला होता. त्याचा व्हिडीओ गुरुवारी सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागली.

मृत युवकाचे नाव कालुराम बच्चनराम (वय 26) असून तो मूळचा राजस्थानचा आहे. त्याच्या डोक्यावर लांब केस होते, तसेच  दाढी वाढविलेली होती. परिसरात तो नवखा होता.कालुराम मुलांना चॉकलेट वाटत होता. यावरून संशय आल्याने स्थानिकांनी त्याला मारहाणीस सुरुवात केली. त्याने अनेकदा बालकचोर नसल्याचे ओरडून सांगितले तरी त्याचे कुणीच ऐकले नाही. जमावातील युवकांनी हाताला सापडेल त्या वस्तूने त्याला मारल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. झाडाची फांदी, बॅट, लोखंडी रॉड आदींनी त्याच्यावर हल्‍ला झाला.

याबाबत एका व्यक्‍तीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन युवकाला रुग्णालयात नेले. पण, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जमावावर एफआयआर दाखल झाला आहे. घटनास्थळावरून नजीकच असणार्‍या सीसी टीव्ही कॅमेर्‍यातील द‍ृश्यांवरून स्थानिकांनीच कालुरामवर हल्‍ला केल्याचे दिसून येते. संशयितांना अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला आहे. दरम्यान, अटकेतील नऊजणांची सुटका करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी तसेच रहिवाशांनी पोलिस ठाण्यासमोर गुरुवारी दिवसभर ठिय्या मांडला होता.

अफवा परसवू नका

परराज्यातील बालकचोर टोळी कर्नाटकात दाखल झाली असून क्षणार्धात मुले घेऊन ते फरारी होतात, अशी अफवा पसरली आहे. तशी कोणतीच टोळी बंगळुरात आली नाही की कोणतीही बालकचोराची घटना घडली नसल्याचे स्पष्टीकरण पोलिस आयुक्‍त टी. सुनीलकुमार यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोलार, गुलबर्गा, तुमकूरसह अनेक जिल्ह्यांत बालकचोर टोळीची प्रचंड अफवा पसरली आहे. याचाच परिणाम म्हणून एका निष्पाप युवकाचा जमावाच्या हल्ल्यात बळी गेला आहे. संशयित कुणीही असले तरी कायदा हातात घेऊन हल्‍ला करू नये, तो अक्षम्य गुन्हा असेल, असे सुनीलकुमार म्हणाले.

असं का घडलं?

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कर्नाटकात बालकचोर टोळीबाबतचा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. पालकांनी आपापल्या मुलांना चोरांपासून सांभाळण्याचा इशारा त्यातून देण्यात आला आहे.

दोघे वाचले

घटनेवेळी अंजनप्पा गार्डनच्या परिसरात आणखी घटना घडली. राजकुमार आणि मंजुनाथ या युवकांवर स्थानिकांनी बालकचोर समजून हल्‍ला केला. घटनास्थळी वेळेवर पोलिस आल्याने ते वाचले. पोलिसांनी दोघा युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे.