Wed, Apr 24, 2019 21:43होमपेज › Belgaon › चंदीगड सोडा, स्मार्ट सिटीवर बोला

चंदीगड सोडा, स्मार्ट सिटीवर बोला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


बेळगाव : प्रतिनिधी

निधी उपलब्ध नसताना ‘मनपा’ सदस्यांनी अभ्यास दौर्‍याच्या नावावर चार दिवसांचा चंदीगड दौरा केला. यावर ‘मनपा’च्या कालच्या सर्वसाधारण बैठकीत उलटसुलट चर्चा झाली. दौरा यशस्वी झाल्याचा आव आणणार्‍या सदस्यांना याच दौर्‍यात सहभागी झालेल्या काही सदस्यांनी बेळगावात महत्त्वाचे प्रकल्प होत नाहीत. ठरावांची अंमलबजावणी होत नाही. अनधिकृत कामांची पाठराखण केली जाते. बेळगाव स्मार्ट सिटी कामांची अंमलबजावणी काय झाली, असा प्रश्‍न उपस्थित केला. दौर्‍याचे सारथ्य करणार्‍या महापौर संज्योत बांदेकर यांनी चर्चा आटोपती घेऊन स्मार्ट सिटी कामांबाबत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

दौर्‍याची माहिती देताना पंढरी परब म्हणाले, दौर्‍यात ओल्या, सुक्या कचर्‍यातून सोप्या पद्धतीने वीज आणि गॅसनिर्मिती प्रकल्पांची माहिती मिळाली. त्याच धर्तीवर बेळगावात नेहमीच्या व वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प राबविण्यात यावा. तेथील सांडपाणी प्रकल्पाची पाहणी केली. तेथील सांडपाण्यात अन्य कचरा पडत नसल्याचे निदर्शनास आले. घनकचरा निर्मूलनाची माहिती घेतली किरण सायनाक म्हणाले जाहिरात फलकमुक्‍त चंदीगडप्रमाणे बेळगाव केंद्रशासित करावे. बांधकाम कचर्‍यातून चंदीगडप्रमाणे रॉक गार्डन बनवावे. दीपक जमखंडी म्हणाले चंदीगड शहरात दूरदृष्टीनेे विकासाची कामे झाल्याने विविध पर्याय आले. बेळगावात प्रकल्पांसाठी वर्षानुवर्षे वाट पहावी लागते. भैरेगौडा पाटील यांनी हलगा येथील शेतकर्‍यांना चंदीगड सांडपाणी प्रकल्प दाखविल्यास त्यांच्या मनातील शंका दूर होतील, असे मत व्यक्‍त केले. 

अ‍ॅड. रतन मासेकर म्हणाले, नकारात्मक मानसिकता बदलायला हवी. अन्य शहरांऐवजी बेळगावचा कायापालट नागरिकांच्या सहकार्यातून घडेल. सरिता पाटील म्हणाल्या, शहरात अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालावेत. चंदीगड धर्तीवर दळणवळणाची साधने उपलब्ध व्हावीत. विनायक गुंजटकर म्हणाले, अधिकार्‍यांवर वचक हवा. निर्णयांची अंमलबजावणी हवी. स्मार्ट सिटीचे काय झाले,  याची आयुक्‍तांनी माहिती देण्याची मागणी केली. अनुश्री देशपांडे यांनी चंदीगड येथील रहदारी व्यवस्थेची माहिती देताना बेळगावात प्रत्येक प्रभागाला वाढीव निधी देण्याची मागणी केली. राजू बिर्जे यांनी अनधिकृत वसाहती शहर विकासात अडथळे ठरत आहेत. वैशाली हुलजी, माया कडोलकर, दिनेश नाशीपुडी यांनी मते मांडली. 

महापौर म्हणाल्या, जादा निधी मिळाल्यास चंदीगड धर्तीवर बेळगावचा विकास घडेल. राखीव निधीसाठी नगरविकास सचिवांची भेट घेऊ. स्मार्ट सिटी कामांच्या माहितीसाठी बैठक घेतली जाईल.