Tue, Jul 16, 2019 01:39होमपेज › Belgaon › निपाणीत आता ‘लक्ष्मी’चा खेळ

निपाणीत आता ‘लक्ष्मी’चा खेळ

Published On: Aug 30 2018 1:16AM | Last Updated: Aug 29 2018 11:45PMनिपाणी : राजेश शेडगे, मधुकर पाटील

नगरपालिका निवडणूक काही तासांवर आली आहे. आता वैयक्‍तिक प्रचारावर भर दिला जात आहे. जेवणावळी, भेटवस्तू, हळदी-कुंकू, सहलींचा आधार घेऊनही विजयासाठी कंबर कसावी लागणार आहे. मताला पाचशे ते हजार रुपयापर्यंत वाटण्यास सुरूवात झाली आहे. एका मताला पाचशेप्रमाणे घरात पाच-सहा जणांचे कुटुंब असल्यास प्रतिघर अडीच ते तीन हजार रु. देण्यास काही जणांनी पुढाकार घेतला आहे.

मध्यस्थांच्या आधारे पैशाचे वाटप सुरू झाले असून मते फिक्स करण्यासाठी ओळखपत्रे काही ठिकाणी जमा करण्यात येत आहेत. निवडणुकीत उमेदवारांनी घरोघरी प्रचार केला. आजी-माजी आमदारांच्या सभा, बैठका घेतल्या. जेवणावळी, भेटवस्तूसह सहलींची मेजवानी मतदारांना दिली. आता पाचशे ते हजारपर्यंतचा दर मतदारांना सुखद धक्काच आहे. यंत्रणा राबविण्यासाठी अनेक ठिकाणी सुशिक्षित मतदारांचा वापर केला जात आहे. अखेरच्या टप्प्यात कोणतीही जोखीम न घेण्यासाठी हा दर दोन हजाराच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे. 

विरोधकांच्या समर्थकांची फोडाफोडी, नव्या मतदारांची जोडाजोडी व त्यासाठी हवी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सुरु असलेली घालमेल  आणि रात्रीचा दिवस करुन आपल्या उमेदवाराच्या पारड्यात मते कशी अधिक पडतील, यासाठी आता लक्ष्मीचा खेळ सुरु झाला आहे. गाठी-भेटी, भेटवस्तू वाटप, निवेदने या मार्गाने मतदारांशी संपर्क साधला जात आहे.

अनेक उमेदवारांनी वॉर्डातून पदयात्रा काढून शक्‍तिप्रदर्शन केले. पदयात्रेत सहभागी मतदारांची नोंद विरोधकांनी घेऊन त्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी गाठीभेटींना वेग आला आहे. रात्री उशिरापर्यंत मध्यस्थांच्या उपस्थितीत सौदेबाजी, मनधरणी व दमबाजीही सुरू आहे. आचारसंहिता धाब्यावर बसवत प्रशासनाचा डोळा चुकवून मतदारांपर्यंत अधिकाधिक रसद पोहचविण्याचा प्रयत्न सुुरु आहे. शक्तिप्रदर्शनामुळे काही संभाव्य विजयी उमेदवारांचेही धाबे दणाणले आहेत. रात्री फक्‍त फोडाफोडावरीच अधिक भर दिला जात आहे. 

उमेदवारांनी कसली कंबर

रात्रभर पडद्यामागील हालचाली सुरु असून शहरात नावालाच आचारसंहिता दिसते. निवडणूक आयोगाचे निरीक्षक कोठेही फिरताना दिसत नाहीत. यामुळे उमेदवारांनी आपल्या हालचाली गुप्त पध्दतीने राजरोस चालविल्या आहेत. विजयासाठी अधिकाधिक मते फिक्स  करण्यासाठी अजूनही एक रात्र शिल्लक आहे. याचा फायदा उठविण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे.