Sat, Jul 20, 2019 08:43होमपेज › Belgaon › विधानसभेच्या सूत्रानुसारच पालिकेचे गणित

विधानसभेच्या सूत्रानुसारच पालिकेचे गणित

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 10 2018 11:27PMनिपाणी : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीची चर्चा मावळत असताना नगरपालिका निवडणूक चर्चेला उधाण आले आहे. 10 ऑगस्टपासून अर्ज भरणा प्रक्रियेस प्रारंभ झाला असून निपाणी नगरपालिकेसाठी भाजप व काँग्रेसप्रणित गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीत दिसणारा काँग्रेस गट या पालिका निवडणुकीत भाजप विरोधात उतरण्याची चिन्हे अधिक आहेत. त्यामुळे विधानसभेच्या सूत्रानुसारच पालिकेच्या विजयाचे गणित सोडविण्यासाठी काँग्रेस गट व भाजप पक्षातर्फे प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत आहे.

नगरपालिका निवडणुकीनिमित्त इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. पालिकेत ना हरकत प्रमाणपत्रासाठी सुमारे 250 अर्ज गेल्याने 31 वॉर्डांसाठी होणार्‍या निवडणुकीत इच्छुकांची संख्या अधिक आहे. माजी आ. काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी एकत्र येऊन काँग्रेसप्रणित गटातून निवडणूक लढविण्याची चिन्हे अधिक आहेत. दुसरीकडे भाजपने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीतही माजी आ. काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी भाजपविरोधी भूमिका घेतली होती. आता नगरपालिका निवडणुकीतही भाजपविरोधी हा काँग्रेसप्रणित गट एकत्रित लढण्याची चिन्हे गडद आहेत. अनेक इच्छुकांनी नेत्यांकडे पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची मागणी केली आहे. भाजपने कार्यकर्त्यांची बैठक आणि इच्छुकांच्या मुलाखती घेऊन रणनितीस प्रारंभ केला आहे.

अर्ज भरणा प्रक्रियेस शुक्रवारपासून सुरुवात झाली असली तरी शनिवारी अमावस्या असून रविवारी श्रावण मास सुरु होणार असल्याने सोमवारनंतरच मुहूर्त साधून उमेदवारांची अर्ज दाखल करण्यास लगबग सुरु होणार आहे. ना हरकत प्रमाणपत्रांसाठी पालिकेत आलेल्या अर्जांच्या विचार करता नेत्यांसमोर इच्छुकांची मनधरणी करुन उमेदवार निश्‍चित करताना डोकेदुखी बनली आहे.

अंतिम आरक्षणातून 14 ठिकाणचे आरक्षण बदलून आल्याने सत्ताधारी गटाला सोयीस्कर बनल्याची चर्चा शहरवासियांतून ऐकावयास मिळाली. पण भाजपची रणनीती आणि अंतर्गत व्यूहरचना पालिकेत सत्ता निर्माण करण्यासाठी कितपत यशस्वी ठरणार, हे पहावे लागणार आहे. आ. शशिकला जोल्‍लेंनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत पालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्‍वास व्यक्‍त केला आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तीन-चार हजाराचे बहुमत मिळाले होते. पण भाजपलाही अपेक्षेपेक्षा जादा मतदान झाल्याने पालिका निवडणुकीत मतांची गोळाबेरीज करण्यात नेतेमंडळींचे प्रयत्न दिसत आहेत. अनेक इच्छूक मतदारांच्या गुप्‍त गाठीभेटी घेऊन मते जाणून घेण्यावर भर देताना दिसत आहेत. पालिका निवडणुकीत मतदारांना खेचण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरतच करावी लागणार आहे. पालिका निवडणुकीनिमित्त आता राजकीय आखाड्यांना चांगलाच रंग चढला आहे. काँग्रेसप्रणित गट आणि भाजपमध्ये सरळसरळ लढत असून  सर्वत्र निवडणुकीची चर्चा ऐकावयास मिळत आहे.