Wed, Apr 24, 2019 20:04होमपेज › Belgaon › विषय पत्रिकेवरून संभ्रम

विषय पत्रिकेवरून संभ्रम

Published On: Dec 22 2017 1:25AM | Last Updated: Dec 21 2017 11:50PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

मनपाची सर्वसाधारण बैठक दि. 29 रोजी होणार आहे. महापौर संज्योत बांदेकर यांनी बोलाविलेल्या बैठकीच्या विषय पत्रिकेबाबत अद्यापही संभ्रम आहे. दिल्लीत पार पडलेल्या स्मार्टसिटी बैठकीची माहिती आयुक्त शशिधर कुरेर यांनी याा  बैठकीत स्पष्ट करावी. शहरातील अनधिकृत बांधकामांचा विषय चर्चेत आणावा, यावर अनेक नगरसेवकांमध्ये चर्चा सुरू आहे. महापौर बांदेकर सर्वसाधारण बैठकीत कोणत्या विषयांना प्राधान्य देणार, याचा सस्पेन्स  कायम आहे. 

गेल्या आठवड्यात झालेल्या प्रशासकीय बैठकीत हेस्कॉम व पाणी पुरवठा महामंडळाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरण्यात आले होते. त्यामुळे पुढच्या सर्वसाधारण बैठकीत त्या दोन्ही खात्यांशी संबंधित विषयांना प्राधान्य देण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र पाणी पुरवठा व्यवस्थेतील गलथान कारभारानंतरही निर्ढावलेल्या पाणीपुरवठा अधिकार्‍यांनी कारभार सुधारण्याऐवजी वाढीव पाणीपट्टीसंदर्भात मनपावर दबाव आणण्याचे काम सुरू केले आहे. वाढीव पाणीपट्टीसाठी प्रसंगी ‘अर्थपूर्ण’ व्यवहाराचे गाजरही काहींना दाखविण्यात आल्याची मनपा वर्तुळात चर्चा  आहे. यामुळे सर्वसाधारण बैठकीत वाढीव पाणीपट्टीला सभागृहाची मंजुरी मिळणार का, याकडे लक्ष राहणार आहे. 

बांधकाम स्थायी समितीने अनधिकृत बांधकामांवरून जोरदार हालचाली चालवल्या आहेत. महापालिकेच्या धरसोड वृत्तीमुळे शहरात अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. अनधिकृत बांधकामांना राजकीय नेते आणि अधिकार्‍यांचा वरदहस्त आहे. अनधिकृत बांधकामांचे खापर विद्यमान नगरसेवकांवर फोडण्यात येत आहे. बांधकामांवर सभागृहात सविस्तर चर्चा करून बड्या बांधकामांवर ठोस कारवाई करावी, यावर बहुसंख्य नगरसेवकांचे एकमत आहे. पुढील आठवड्यात होणार्‍या सर्वसाधारण बैठकीत अनधिकृत बांधकामांवर चर्चा करून ठोस निर्णय घेतला जावा, असे मत नगरसेवकांमधून व्यक्त होत आहे. मात्र महापौर बांदेकर नक्की कोणत्या महत्त्वाच्या विषयांना बैठकीत प्राधान्य देणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून  आहे.