Fri, Jul 19, 2019 01:01होमपेज › Belgaon › अर्थसंकल्पात मराठीला बगल की विसर?

अर्थसंकल्पात मराठीला बगल की विसर?

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 15 2018 11:24PMबेळगाव : प्रतिनिधी

मनपा अर्थसंकल्पातून मराठीला हद्दपार केले आहे. मराठी नगरसेवकांनी मौन बाळगले असून संताप व्यक्त होत आहे. अर्थसंकल्पाची छपाई कन्नड, इंग्रजीतून केली. पण मराठीला पूर्णपणे वगळण्यात आले. त्रिभाषा धोरणाला हरताळ फासला गेला आहे.  मुखपृष्ठावर लाल-पिवळा रंग देऊन कानडीकरणाचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार मराठीला बगल देण्यासाठी केलेला जाणीवपूर्वक प्रयत्न की विसर, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. याविरोधात आवाज उठविण्याची आवश्यकता असल्याची मागणी मराठी भाषकांतून होत आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढ्याचा मुख्य केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेळगाव मनपामध्ये मराठी भाषकांची सत्ता असताना झालेला प्रकार मराठी भाषकांच्या जिव्हारी लागणारा आहे. सभागृहात एकाही मराठी नगरसेवकाने याबाबत आवाज उठविण्याचे कष्ट घेतले नाहीत.

मनपामध्ये मराठी भाषकांचे वर्चस्व आहे. परंतु अर्थ आणि कर स्थायी समितीचे अध्यक्षपद विरोधी गटाकडे आहे. याचा अध्यक्षही मराठी भाषकच आहे. यामुळे अर्थसंकल्प तयार करताना लक्ष देणे आवश्यक होते.  दुर्लक्ष झाल्यामुळे अधिकार्‍यांनी हातचलाखी केल्याची शक्यता अधिक आहे. अर्थसंकल्पातून मराठीला हद्दपार करण्याबरोबर मुखपृष्ठालाही कानडी झेंड्याचा लाल-पिवळा रंग दिला आहे. यातून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे.

मनपामध्ये यापूर्वीच त्रिभाषा सूत्रीचा अवलंब करण्याचा ठराव संमत झाला आहे. त्यानुसार सर्व कागदपत्रे मराठी, कन्नड व इंग्रजीतून देणे आवश्यक आहे. याकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करत आहेत. यामुळे मराठीची कावीळ झालेल्या अधिकार्‍यांचे फावले आहे.