Tue, Apr 23, 2019 18:06होमपेज › Belgaon › ‘तहसील’ला रात्री घेराव

‘तहसील’ला रात्री घेराव

Published On: Aug 28 2018 1:23AM | Last Updated: Aug 27 2018 11:40PMबेळगाव : प्रतिनिधी

पीएलडी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी मंगळवार दि. 29 रोजी होणारी निवडणूक लांबणीवर पडल्याचा आदेश तहसीलदार मंजुळा नाईक यांनी बजावला आहे. यामुळे राजकारण पेटले आहे. तहसीलदार नाईक यांच्या निर्णयाला विरोध करत आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी  सोमवारी रात्री तहसील कार्यालयाला घेराव घालून आंदोलन छेडले तसेच घोषणाबाजीही केली.

पीएलडी बँक अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीच्यानिमित्ताने काँग्रेसच्या दोन गटात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. हेब्बाळकर गटाने रात्री आंदोलन छेडताना पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर थेट निशाणा साधला. त्यांच्या आदेशामुळेच तहसीलदारांनी निवडणूक लांबणीवर टाकल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेवटच्या अडीच वर्षांसाठी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूका वेळापत्रकानुसार मंगळवारी 28 रोजी होणार होती. मात्र सोमवारीच तहसीलदारांनी निवडणूक लांबणीवर टाकण्याचा आदेश बजावला.

बँकेच्या संचालक मंडळावर काँग्रेसचे बहुमत आहे. यामुळे काँग्रेस सदस्यांना अध्यक्ष-उपाध्यक्ष पदे काँग्रेसला मिळण्याची संधी अधिक होती. मात्र, अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटाचे सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. निवडणुकीतून आ. लक्ष्मी हेब्बाळकर व पालकमंत्री रमेश जारकीहोळी, आ. सतीश जारकीहोळी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. दोन्ही गटांनी सदस्यांना अज्ञातस्थळी नेवून ठेवले आहे. 

महादेव पाटील (उचगाव), परशराम पाटील (यळेबैल), अ‍ॅड. शंकर नावगेकर (मच्छे), गीता बाबुराव पिंगट (काकती), सौ. बिर्जे (कडोली) हे म. ए. समिती संचालक कार्यरत आहेत. परंतु, काही दिवसांपासून ते अज्ञातवासात होते.