Sat, Apr 20, 2019 16:24होमपेज › Belgaon › वडगाववासीयांचे आंदोलन

वडगाववासीयांचे आंदोलन

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 12:24AMबेळगाव : प्रतिनिधी

वडगाव, खासबाग, जुने बेळगाव व उपनगरांमधून चिकुनगुनिया, डेंग्यू, हिवताप आदी रोग फैलावले असूनही मनपा आरोग्य यंत्रणा सुस्त असल्याने संतप्त महिलांनी सोमवारी मनपासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच तातडीने  उपाय योजून विशेष उपचार केंद्र सुरू न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला.

वडगाव परिसरात साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी विशेष उपचार केंद्र तातडीने स्थापन केले जावी, अशी मागणी ‘पुढारी’ने गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने मांडली आहे. त्याची दखल घेत महिलांनी सोमवारी आंदोलन केले. चिकुनगुनिया, डेंग्यू, हिवताप आजारांवरील वैद्यकीय खर्च सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नाही. त्याकरिता मनपाने प्रभावी उपाययोजना योजावी, तसेच विशेष उपचार केंद्र सुरू करावे,  भागातील गटारी व नाल्यांची तातडीने स्वच्छता करून कचर्‍याची उचल करावी, गटारी व नाल्यांवर औषध फवारणी करावी, अशा मागण्या महापौर व आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

लवकरच मंगाई यात्रा होणार असल्याने  त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी  विनाविलंब पाटर केंद्र सुरू करून कार्याला प्रारंभ करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मनपा आयुक्त व महापौर, उपमहापौरांनी केवळ करवसुलीवर लक्ष केंद्रीत करू नये तर नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्याकरिताही लक्ष केंद्रीत करावे, अशीही मागणी महिलांनी केली.आंदोलनामध्ये माजी नगरसेविका वर्षा आजरेकर, कविता शिंदे,  रेणुका पाटील, श्रावणी इंगळे, वैशाली जाधव, मंगला इंगळे, गुरुनाथ पाटील, लक्ष्मी खोराटे, लक्ष्मी केसरकर, रेणुका जायाण्णाचे, प्रभावती लाड, छाया पाटील, विजया बगाडे, लक्ष्मी अकनोजी, लक्ष्मी यळगुकर, लक्ष्मी कदम, विणा कदम, प्रतिभा सडेकर, सुनेत्रा निलजकर, विजया बगाडे व मंगाई महिला मंडळाच्या सदस्यांनी भाग घेतला होता.