होमपेज › Belgaon › ...तर स्वतंत्र उ. कर्नाटकसाठी आंदोलन

...तर स्वतंत्र उ. कर्नाटकसाठी आंदोलन

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 24 2018 8:57PMबेळगाव : प्रतिनिधी

उत्तर कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष केल्यास स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागनूर रूद्राक्षीमठाचे सिद्धराम स्वामींनी दिला.मठाधीशांच्या पत्रकार परिषदेत स्वामी बोलत होते. याआधी अखंड कर्नाटकासाठी उत्तर कर्नाटकातील लोकांनी आंदोलन केले होते. येथील लोकांचा वेगळ्या राज्याचा आग्रह नाही. पण, गेल्या काही वर्षांपासून अनुदान मंजूर करण्यात सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकचा बहुतेक भाग विकासापासून वंचित राहण्याची भीती आहे. आगामी काळात याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा वेगळ्या राज्यासाठी आंदोलन हाती घेण्याची वेळ येणार असल्याचे सिद्धराम स्वामी म्हणाले. 

स्वामी म्हणाले, याआधीच्या सरकारांनी उत्तर कर्नाटककडे लक्ष दिले नव्हते. आता काँग्रेस-निजद आघाडी सरकार अस्तित्वात आले तरी फार मोठा बदल झालेला नाही. केवळ चिकोडीतील पाणीपुरवठा योजनेला अनुदान मंजूर करण्यात आले आहे. इतर कोणत्याही नव्या योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही. निवडणुकीआधी राजकीय पक्षांनी आश्‍वासने दिली. पण, निवडणूक झाल्यानंतर आश्‍वासनांचा त्यांना विसर पडला आहे.

या भागातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पाटबंधारे योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करावी. पायाभूत सुविधा पुरवाव्यात. हा अन्याय आणखी किती दिवस सहन करणार. आगामी काळात वेगळ्या राज्याच्या आंदोलनासाठीचे आंदोलन तीव्र झाल्यास त्यास सरकारच जबाबदार राहील, असा इशाराही सिद्धराम स्वामींनी दिला.हुक्केरीतील हिरमठाचे स्वामी चंद्रशेखर शिवाचार्य म्हणाले, बेळगावात 400 कोटी रुपये खर्चून सुवर्णसौधचे निर्माण करण्यात आले. मात्र, वर्षातील केवळ 10 दिवस त्याचा वापर होतो. काही सरकारी कार्यालयांचे स्थलांतर सुवर्णसौधमध्ये केल्यास इमारतीचा विनियोग होईल.

31 जुलैला आंदोलन

31 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत सुवर्णसौधसमोर मठाधीशांकडून धरणे आंदोलन हाती घेण्यात येणार आहे. उत्तर कर्नाटकाचा विकास करा, अन्यथा वेगळ्या राज्यासाठी आंदोलनाचा इशारा याद्वारे दिला जाणार आहे.

वेगळ्या राज्याचा खर्च पेलवणार का? : मुख्यमंत्री कुमारस्वामी

भाजपचे काही नेते वेगळ्या उत्तर कर्नाटक राज्याची मागणी करत आहेत. पण वेगळे राज्य निर्माण झालेच तरी त्या राज्याला स्वतःचा खर्च निभावून नेण्याची ताकद आहे का, असा प्रश्‍न मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे.निजदतर्फे चन्नपट्टण येथे आयोजित सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. भाजप नेते श्रीरामुलू आणि उमेश हुक्केरी वेगळ्या राज्याची मागणी करत आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि माझ्या कार्यकाळात उत्तर कर्नाटकासाठी काय देण्यात आले, याची जाहीर चर्चा करण्याची तयारी असल्याचे आव्हान त्यांनी दिले. बेळगावात 450 कोटी खर्चून सुवर्णसौध निर्माण करण्याचा निर्णय आपल्या कार्यकाळात झाला. तेथे अधिवेशन भरवण्याचा निर्णयही आपलाच होता. यंदा शेतकर्‍यांना कर्जमाफीचा निर्णय घेतला. याचा सर्वाधिक लाभ बेळगाव आणि त्यानंतर बागलकोट जिल्ह्याला होणार आहे. तरीही उत्तर कर्नाटकावर अन्याय झाल्याचा आरोप केला जाणे योग्य नसल्याचे कुमारस्वामी म्हणाले.