Thu, Apr 25, 2019 21:42होमपेज › Belgaon › दारूविक्रीविरोधात निपाणीत आंदोलन

दारूविक्रीविरोधात निपाणीत आंदोलन

Published On: Dec 20 2017 1:39AM | Last Updated: Dec 20 2017 1:04AM

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

शहरामध्ये सर्व नियम पायदळी तुडवून बेकायदेशिररीत्या दारू विक्री होत आहे. याबाबत अबकारी तसेच पोलिस प्रशासनाला निवेदन देऊनही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे याविरोधात कर्तव्य फाऊंडेशन, नागरिक व महिलांच्यावतीने विशेष तहसील कार्यालयासमोर मंगळवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

सकाळी उपतहसीलदार एन. बी. गेज्जी यांनी मध्यस्थी करून आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र याला दाद न देता नागरिकांच्यावतीने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. वॉकर्स मंडळाच्यावतीने सदस्यांनी आंदोलनस्थळी जाऊन पाठिंबा दिला. आंदोलकानी अबकारी खात्याच्या अधिकार्‍यांशी चर्चा करण्याचा आग्रह धरला. दुपारी उपनिरीक्षक प्रवीण रंगसुबे आंदोलनस्थळी दाखल झाले. आंदोलकांनी त्यांना धारेवर धरले. 

सायंकाळी वॉईनशॉपमध्ये बैठक व्यवस्था दिसून आल्यास कारवाईचे आदेश दिले. आंदोलनाचे हत्यार संघटनेने उपसताच अधिकारीवर्गाची तारांबळ उडाली. गेज्जी यांच्यासह फौजदार शशिकांत वर्मा, सहाय्यक फौजदार एम. जी. निलाखे यांनीही कार्यालयाबाहेर ठाण मांडले. सायंकाळी वाईनशॉपमधील बैठक व्यवस्था बंद झाली. आर्थिक व्यवहारामुळेच पोलिस व अबकारी खाते संगनमताने बेकायदेशीर कृत्ये करणार्‍यांना पाठीशी घालत आहे. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.