Sun, Jul 21, 2019 05:33होमपेज › Belgaon › हिसका दाखवताच एफसीआय नरमले

हिसका दाखवताच एफसीआय नरमले

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 12 2018 11:03PMबेळगाव : प्रतिनिधी

बेनकनहळ्ळी येथील एफसीआय गोदामानजीक वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणार्‍या धान्य वाहतूक ट्रक चालकाविरोधात आंदोलनाचा हिसका दाखवताच एफसीआय प्रशासन नरमले. व्यवस्थापकांनी वाहतूक ठेकेदारांना वाहतुकीची शिस्त पाळा अन्यथा कारवाईचा बडगा उचलू असा इशारा दिला. आठ दिवसांत वाहतुकीत सुसूत्रपणा न आल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

बेनकनहळ्ळी येथे भारतीय अन्न महामंडळाचे गोदाम आहे. येथून धान्याची ने-आण करणारे ट्रकचालक मनमानी करतात. एफसीआयने ट्रकचालकांसाठी पावती पद्धत सुरू केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून ट्रकचालक मनमानी करतात. यामुळे रस्त्यात वाहतूक कोंडी होते. याचा फटका वाहनधारकांना बसतो. 

रविवारी साडेदहाच्या सुमारास धान्य वाहतूक करणार्‍या ट्रक चालकांची गोदामाच्या रस्त्यावर मनमानी चालली होती. यामुळे रस्त्याने ये-जा करणार्‍या वाहनधारकांची कोंडी झाली. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी एफसीआय गेटसमोर आंदोलन केले.ट्रकचालकांच्या मनमानीबाबत अधिकार्‍यांना जाब विचारण्यात आला. यावर अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. गोदामच्या बाहेर वाहनांना शिस्त लावण्याची जबाबदारी नसल्याची बेजबाबदार उत्तरे दिली.

यामुळे संतप्त बनलेल्या आंदोलकांनी गोदामच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला. त्यांना आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर व्यवस्थापक मुरली यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. ट्रकचालकांच्या सुरू असणार्‍या मनमानीची माहिती दिली. रस्त्याने जाणार्‍या वाहनधारकांना कोणताही अडथळा न होता, वाहतूक करण्याची जबाबदारी संबंधित अधिकार्‍यांची असल्याचे बजावले.

व्यवस्थापक मुरली यांनी महिन्याच्या 20 तारखेपर्यंत गोदामाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याची कबुली दिली. यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन देऊन वाहतूक ठेकेदारांना सक्त सूचना दिली. प्रवेश करताना मुख्य रस्त्यावर अडथळा होऊ नये, याची खबरदारी घ्यावी असे सूचविले. त्याचबरोबर वाहतुकीला अडथळा आणणार्‍या  चालकावर कारवाईचा इशारा दिला. त्याला वाहतूक ठेकेदारांनी संमती दर्शविली.