Thu, Apr 25, 2019 21:30होमपेज › Belgaon › मातृभाषेतील शिक्षण जीवन घडविते

मातृभाषेतील शिक्षण जीवन घडविते

Published On: Dec 24 2017 1:43AM | Last Updated: Dec 23 2017 9:49PM

बुकमार्क करा

बेळगाव ःप्रतिनिधी 

जीवन घडविण्याचे काम शिक्षणाच्या माध्यमातून होत असते. यामध्ये मातृभाषेतील शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावत असते. जीवन यशस्वी होण्यासाठी मातृभाषेतील शिक्षण गरजेचे असते. यासाठी पालकांनी मातृभाषेतून शिक्षण देण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन माजी आ. मनोहर किणेकर यांनी केले. 

कुद्रेमानी येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेचा शतकमहोत्सव सोहळा शनिवारी शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी किणेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शंकर पाटील होते.

माजी आ. किणेकर म्हणाले, प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा पाया असतो. हा पाया मातृभाषेतील शिक्षणामुळे अधिक मजबूत होतो. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण मनावर बिंबते. समजणे सोपे जाते. प्राथमिक शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता वाढणे आवश्यक आहे. यासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढीकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे. 

काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, खेड्यातील मुलांना उत्तम आरोग्य, शिक्षण मिळायला पाहिजे. हा त्यांचा अधिकार आहे. प्रत्येकाच्या मातृभाषेचा आदर करणे सर्वांचे कर्तव्य आहे. 
जि.पं. सदस्या सरस्वती पाटील म्हणाल्या, सीमाभागातील मराठी माणसांवर अन्याय होत आहेत. त्याविरोधात आम्ही लढा देत आहोत. मराठीचे जतन करण्याचे काम करत आहोत. यासाठी मराठी शाळा वाचविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. 

ग्रा. पं. अध्यक्षा अशिता सुतार, सदस्य नागेश राजगोळकर, विनय कदम, गटशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, जयकुमार हेब्बळी यांनी मनोगत व्यक्त केले. 

प्रारंभी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. संजय राजगोळकर यांनी पालखी पूजन केले. एम. डी. पाटील, अशोक पाटील यांनी ग्रंथपूजन केले. ग्रंथदिंडीचे उद्घाटन एस. एस. काकतकर, गंगाराम पन्हाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. 

माजी आ. मनोहर किणेकर यांनी बालव्यासपीठ, लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यासपीठ तर सभामंडपाचे उद्घाटन विनय कदम यांनी केले. दीपप्रज्वलन ग्रा.पं. अध्यक्षा अशिता सुतार मल्लवा नाईक, शामला गुरव, निर्मला सुतार यांनी केले. 

ता. पं. सदस्या शुभांगी राजगोळकर, दीपक पाटील, नागेंद्र राजगोळकर, संजय पाटील, मोहन पाटील, काशिनाथ गुरव, जोतीबा बडसकर, काशिनाथ देवण, वैजनाथ राजगोळकर, सुरेश पाटील, राम पन्हाळकर, इंदूबाई पाटील,प्रभाकर गुरव, कांचन पिसे, शाहू पाटील, निळकंठ साखरे, डॉ. निवृत्ती गुरव, अरुण देवणे यांच्याहस्ते विविध प्रतिमांचे पूजन करण्यात आले. 
प्रास्ताविक गोपाळ चौगुले यांनी तर रवि पाटील यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन अरविंद पाटील यांनी केले.