होमपेज › Belgaon › राज्यामधील देवदासींची हवी गणती, पुनर्वसन

राज्यामधील देवदासींची हवी गणती, पुनर्वसन

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 9:40PMजमखंडी : वार्ताहर

विविध मागण्यांकरिता कर्नाटक राज्य देवदासी महिला विमोचन संघाच्या नेतृत्त्वाखाली जमखंडीत प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. तसेच मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या नावे तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.

देवदासी महिलेला पाच एकर जमीन द्यावी, मासिक पेन्शन वाढवून 3 हजार रुपये करावी, राज्यातील देवदासी महिला व कुटुंबाची गणती करावी, पुनर्वसनासाठी प्रत्येक वर्षाला पाच हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद करावी, पाच लाख रुपयांचे घर बांधून द्यावे, देवदासींच्या मुलांना पदवी शिक्षणासाठी पॅकेज द्यावे, त्यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, रोहयोत किमान 200 दिवस काम व त्याकरिता 600 रुपये मजुरी द्यावी, मुलींच्या विवाहाकरिता पाच लाख रुपये द्यावेत व मुलांचे वय 25 हून अधिक असलेल्या बेरोजगारांना मासिक 3 हजार रुपये भत्ता द्यावा आदी मागण्या मांडण्यात आल्या.

राज्यात 39 हजार तर बागलकोट जिल्ह्यात 8666 देवदासी असून त्यांना देण्यात येणारी मासिक पेन्शन अत्यल्प असल्याचे संघटना राज्य अध्यक्ष परशुराम मरेगुद्दी यांनी सांगितले. सकाळी येथील ए. जी. देसाई सर्कलपासून मोर्चाला प्रारंभ झाला. याचे नेतृत्त्व देवदासी महिला विमोचन संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा कल्‍लव्वा कागी यांनी केले. 

मोर्चात पदाधिकारी सोमू चौरी, सिद्दू सत्यन्नवर, संजू मांग, विलासबाई तेरदाळ, ललिता हरिजन आदींनी भाग घेतला. निवेदनाची प्रत महसूल मंत्री कागोडू तिम्मप्पा, महिला व बालकल्याण मंत्री उमाश्री, समाज कल्याण मंत्री एच. अंजनेय यांना पाठविण्यात आल्या.