Mon, Jul 15, 2019 23:52होमपेज › Belgaon › मान्सूनची दमदार एन्ट्री

मान्सूनची दमदार एन्ट्री

Published On: Jun 11 2018 1:05AM | Last Updated: Jun 11 2018 1:05AMबेळगाव : प्रतिनिधी

मान्सूनच्या पहिल्याच तडाख्याने जिल्ह्याला झोडपून काढले. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवार रात्रीपर्यंत कायम होता. शहरासह खानापूर, रामनगर भागात पावसाचा जोर मोठा होता. बेळगावात ठिकठिकाणी पाणी साचून वाहतुकीत व्यत्यय आला. जिल्ह्यात 77 मि.मी. पावसाची नोंद झाली. मान्सूनच्या दमदार एन्ट्रीने बळीराजा सुखावला आहे.

शनिवारच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या दमदार पावसाने शेतकरी सुखावला आहे. शहर उपनगरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. बेळगावच्या मध्यवर्ती भागात काही घरांत पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. शहर परिसरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

गुरुवार दि. 7 रोजी गोव्यात आलेला मान्सून आज-उद्या करत रविवारी पहाटेपासून कोसळायला लागला. जिल्ह्यात मे महिन्यात 38 मिमी पर्जन्यमान नोंदविले गेले आहे. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून लांबणीवर पडल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. 

शहराच्या काही भागांत पाच ते सहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. मान्सूनच्या आगमनामुळे शहरवासीयही सुखावले असून राकसकोप व हिडकल डॅमच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. 

शेतकर्‍यांनी पेरणी करून दहा, बारा दिवस झाले तरी मान्सून न आल्याने शेतकरी चिंतेत होता. रविवारी झालेल्या मान्सूनमुळे वडगाव, येळ्ळूर, उचगाव, कडोली व अन्य परिसरातील शिवारात पाणीच पाणी झाले. शहर उपनगरात मुसळधार पावसामुळे नाले, ओढे दुथडी वाहत होते. उपनगरान काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. मात्र जीवितहानी झाली नाही. 

दरवर्षी सहा किंवा सात जूनला मृग नक्षत्र बसरायचे. मात्र यंदा मृग सुरू होऊन 3-4 दिवस झाले तरी मान्सूनचे चिन्ह दिसत नव्हते. मान्सूनने खानापुरात दमदार हजेरी लागली. पण चिकोडी, रायबागमध्ये दिवसभर रिमझिम पाऊसच होता. या तालुक्यात पिकांची स्थिती गंभीर असून पाणी टंचाईच्या झळाही सोसाव्या लागत आहेत. जिल्ह्यात गतवर्षीच्या खरीप क्षेत्रापेक्षा यंदा 36 हजार हेक्टर पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा झालेली पेरणी ही गेल्या दहा वर्षातील उच्चांकी आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाज आणि शेतकर्‍यांची उत्सुकता यामुळेच वाढलेले खरीप क्षेत्र मान्सूनमुळे चांगले येईल, अशी आशा शेतकर्‍यांना  लागून आहे.