Sat, Jul 20, 2019 15:30



होमपेज › Belgaon › सावकारी कर्जही करणार माफ

सावकारी कर्जही करणार माफ

Published On: Aug 28 2018 1:23AM | Last Updated: Aug 27 2018 11:07PM



बेळगाव : प्रतिनिधी

कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकर्‍यांना त्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करत आहे. सहकारी संस्था, राष्ट्रीयीकृत बँकांनंतर आता गासगी सावकारांकडून घेतलेले कर्जही माफ केले जाणार आहे. याचा फायदा लहान शेतकरी आणि शेतमजुरांना होणार आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 1976 ते 1980 या काळात देवराज अर्स यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात होते. त्या काळात कर्जातून दिलासा देणारा कायदा त्यांनी जारी केला होता. तसाच कायदा अध्यादेशाद्वारे जारी करण्याची तयारी कर्नाटकातील काँग्रेस-निजद आघाडी सरकार करत आहे. आधी राज्यपाल त्यानंतर राष्ट्रपतींकडे तशी शिफारस केली जाणार आहे.

खासगी सावकारांकडे कर्ज घेतलेल्यांची यादी असते. ती रक्कम परत करण्यासाठी शेतकर्‍यांकडून लेखी हमी घेतली जाते. काहीवेळा दागिने व इतर मालमत्ता गहाण ठेवली जाते. यासंबंधीच्या पुराव्यानुसार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जबरदस्तीने कर्जवसुली करणार्‍या सावकारांना कारावास, सव्वा लाखाचा दंड अशी शिक्षा दिली जाणार आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या नॉनबँकिंग आर्थिक संस्थांचे कर्ज माफ होणार नाही. पण, खासगी सहकारी संस्था, नोंदणीकृत किंवा नोंदणी नसणार्‍या संस्थांमधील कर्ज माफ करण्याची तरतूद अध्यादेशात असणार आहे. खासगी सावकार किंवा इतर संस्थांकडून घेतलेली कागदपत्रे, लेखी पुरावे असावेत, अशी अट असेल.

आयएएस अधिकार्‍यांचे पथक

कर्जमाफी योजनेतील मार्गसूचीला राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांनी पूर्ण मान्यता दिलेली नाही. त्याकरिता दोघा वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखालील अधिकार्‍यांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. चार टप्प्यांत कर्जमाफीची रक्कम बँकांना दिली जाणार आहे. पण, त्यासाठी ठोस हमी नसल्याने बँका मागे सरकत आहेत. यावर समितीकडून तोडगा काढला जाणार आहे.