Mon, Aug 19, 2019 11:10होमपेज › Belgaon › मोहम्मदकैफ चमकला; फेरमुल्यांकनानंतर पैकीच्या पैकी गुण

मोहम्मदकैफ चमकला; फेरमुल्यांकनानंतर पैकीच्या पैकी गुण

Published On: May 31 2018 1:35AM | Last Updated: May 31 2018 1:35AMबेळगाव : प्रतिनिधी

फेरमूल्यांकनात एक गुण वाढल्यामुळे बेळगावचा मोहम्मदकैफ हारूनरशीद मुल्ला हा विद्यार्थी दहावीत राज्यात प्रथम आला आहे. त्याला आता 625 पैकी 625 म्हणजेच प्रत्येक विषयात 100 टक्के गुण मिळाले आहेत. 7 मे रोजी जाहीर निकालात त्याला एकूण 624 गुण मिळाले होते.

मोहम्मदकैफ हा येथील सेंट झेवियर्स शाळेचा विद्यार्थी आहे. त्याला नियमित निकालामध्ये विज्ञान विषयात 100 पैकी 99, तर बाकीच्या पाच विषयांत 100 टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे तो राज्यात दुसरा आणि जिल्ह्यात पहिला ठरला होता. तथापि, त्याला प्रत्येक विषयात 100 टक्के गुण मिळवण्याची खात्री होती. त्यामुळे त्याने विज्ञानची उत्तरपत्रिका फेरमूल्यांकनासाठी पाठवली. फेरमूल्यांकनात त्याला विज्ञानमध्ये 1 गुण वाढीव मिळाला. त्यामुळे त्या विषयातही 100 पैकी 100 गुण झाले.   

बेळगावच्या विद्यार्थ्याने सर्व विषयांत पैकीच्या पैकी गुण घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. यंदाच्या दहावीच्या नियमित निकालात म्हैसूरचा येशस आणि बंगळूरचा सुदर्शन या दोन विद्यार्थिनींनी सर्व विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळवले. त्यांच्या यादीत आता मोहंमदचे नाव जोडले गेले आहे.मोहंमद मुल्लाचे आई-वडिल दोघेही  शिक्षक असून वडिल कित्तूर येथे हिंदी विषय शिकवितात. आई गांधीनगर येथील सरकारी उर्दू शाळेत शिक्षिका आहे. दहावीत यश मिळविण्याबरोबर त्याने शाळेत एनसीसी बेस्ट कॅडेट अ‍ॅवार्ड व बेस्ट बॉय पुरस्कार मिळविले आहेत.