Tue, Mar 26, 2019 07:46होमपेज › Belgaon › मोदी यांच्या भाषणाने जनतेचे पोट भरत नाही

मोदी यांच्या भाषणाने जनतेचे पोट भरत नाही

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 09 2018 12:45AMविजापूर : वार्ताहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले भाषण करतात; पण त्यांच्या भाषणाने जनतेचे पोट भरत नाही. केंद्र सरकारने कोणतीही योजना जारी केली तरी त्या बाबतीत कर्नाटकला अनुदान मंजूर करताना पक्षपात केला. त्याचवेळी भाजपची सत्ता असणार्‍या राज्यांना झुकते माप दिल्याचा प्रहार अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला.येथील बीएलडीई मैदानावर मंगळवारी आयोजित जाहीर प्रचारसभेत त्या बोलत होत्या. कर्नाटकात सिद्धरामय्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने अन्‍नभाग्य, क्षीरभाग्य, मातृपूर्णासारख्या योजना जारी केल्या. पाच रुपयात नाश्ता, दहा रुपयात जेवण देणारे इंदिरा कॅन्टिन सुरू केले. त्यामुळे दारिद्य्ररेषेखालील जनतेची भूक भागत आहे. काँग्रेसची केंद्रात सत्ता असताना महात्मा गांधी रोजगार हमी योजना जारी करण्यात आली. त्यावेळी नरेंद्र मोदींनी योजनेला तीव्र विरोध दर्शविला होता. याची आठवण सोनिया गांधींनी करून दिली.

अशावेळी पंतप्रधान मोदींकडून प्रत्येक सभेत राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला जातो, हे योग्य नाही. भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी पंतप्रधानांनी कोणता ‘रोल मॉडेल’ तयार केला आहे? आपल्या निकटवर्तीयांच्या मुलांना ‘आदर्श’ म्हणून ते समोर आणत आहेत का? असा चिमटा सोनिया गांधींनी काढला. मुख्यमंत्रिपदी असताना येडियुराप्पा यांना कारागृहात जावे लागल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 
भाजपकडून ‘सबका साथ, सबका विकास’चा नारा देत प्रचार केला जात आहे. कर्नाटकात आज अनेक ठिकाणी दुष्काळ आहे. शेतकर्‍यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. मात्र, केंद्राकडून दुष्काळी राज्यांना मदत देताना कर्नाटककडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. आज पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यावर नियंत्रणासाठी केंद्राकडून कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही.

पंतप्रधान मोदी नेहमीच भ्रष्टाचाराविरोधात बोलतात आणि कर्नाटकात येऊन भ्रष्टाचाराचा आरोप असणारे, कारागृहात गेलेल्या नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर ते येतात. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी सोनिया गांधींनी केली.

भाजपला ‘काँग्रेसमुक्‍त’चे स्वप्न

पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमुक्‍तचा नारा वेळोवेळी दिला जात आहे. खोटी आकडेवारी, महान नेत्यांच्या नावांचा गैरवापर करून काँग्रेसमुक्‍तचे स्वप्न पाहिले जात आहे; पण कर्नाटकात असणार्‍या काँग्रेस सरकारची कामगिरी आणि मतदारांकडून मिळत असलेल्या पसंतीचा विचार भाजप नेत्यांनी करावा, असा सल्‍ला सोनिया गांधींनी दिला.