Tue, May 21, 2019 00:06होमपेज › Belgaon › भ्रष्टाचारावर मोदींची भूमिका दुटप्पी : अण्णा हजारे

भ्रष्टाचारावर मोदींची भूमिका दुटप्पी : अण्णा हजारे

Published On: Jan 06 2018 1:18AM | Last Updated: Jan 06 2018 12:51AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने दुटप्पी भूमिका घेत आहेत. एकीकडे देश भ्रष्टाचारमुक्‍त करण्याची घोषणा करत असताना स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचा ते नारा देत आहेत. परंतु जनलोकपाल विधेयकात त्रुटी ठेवून भ्रष्ट अधिकार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असून विधेयकाची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला.

भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समिती व स्नेहालय यांच्या माध्यमातून आयोजित सभेपूर्वी हजारे पत्रकारांशी बोलत होते. 

हजारे म्हणाले, जनलोकपाल विधेयकासाठी देशव्यापी आंदोलन छेडल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग सरकारने हे विधेयक लोकसभा व राज्यसभेत केवळ एका दिवसात कोणत्याही चर्चेविना पारित केले. परंतु यामध्ये काही त्रुटी ठेवण्यात आल्या. सरकारी नोकरांची संपत्ती प्रत्येक वर्षी जाहीर करण्याचे कलम रद्द करण्यात आले. हा प्रकार म्हणजे भ्रष्ट अधिकार्‍यांना पाठीशी घालण्याचा आहे.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील लोकपाल आणि लोकायुक्त कायदा अमलात आणण्यास टाळाटाळ चालविली आहे, हे देशाचे दुर्दैव आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर  त्यांना तीन वर्षाचा कालावधी दिला. परंतु या काळात त्यांनी कोणत्याही प्रकारची सुधारणा केली नाही, अशी खंत हजारे यांनी व्यक्‍त केली.

आता 23 मार्चपासून नवी दिल्लीत आरपारचे आंदोलन छेडण्यात येईल. बेमुदत उपोषण करण्यात येणार असून यासाठी देशव्यापी दौरा सुरू आहे. याला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे ते म्हणाले.

शेतकर्‍यांच्या पिकांना खर्चावर आधारित दर जाहीर करणे आवश्यक आहे. यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. 60 वर्षांहून अधिक वयाच्या निराधार शेतकर्‍यांना निवृती वेतन सरकारने द्यावे. यासाठी संसदेत प्रलंबित असणारे किसान पेन्शन विधेयक विनाविलंब मंजूर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारच्या भूमिकेमुळे शेतकर्‍यांवर कर्जाचा बोजा वाढत आहे. बँकांकडून चक्रवाढ व्याज आकारण्यात येते. यामुळे देशभरातील 12 लाख शेतकर्‍यांनी 22 वर्षात आत्महत्या केल्या आहेत. केंद्र सरकार एकीकडे उद्योगपतींसाठी सुविधा जाहीर करत आहे. त्यांची कर्जे माफ करत आहे. शेतकर्‍यांची कर्जे माफ करण्यास चालढकल करत असल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली. यावेळी कुडलसंगमचे महामृत्युंजयस्वामी उपस्थित होते.