होमपेज › Belgaon › मोदींच्या रॅलींनी भाजपचे वाढले संख्याबळ 

मोदींच्या रॅलींनी भाजपचे वाढले संख्याबळ 

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 17 2018 12:38AMबंगळूर : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलींमुळे भाजपचे संख्याबळ वाढले आहे. या वेळेला तब्बल 46 जागा अधिक मिळाल्या आहेत. हा मोदींचा प्रभाव आहे. निवडणूक  जाहीर होण्यापूर्वी जानेवारीमध्ये बंगळूरसह अन्य काही शहरांना भेट देऊन पक्षसंघटन, नेते, कार्यकर्ते व जनतेचा कानोसा त्यांनी घेतला होता.  मार्चमध्ये निवडणूक जाहीर झाली.  एप्रिलमध्ये काही शहरांना भेट देऊन मोदींनी प्रचारसभा घेतल्या.  शेवटच्या टप्प्यात निवडणुकीला काही दिवस असताना मोदींनी विविध शहरांत रॅलीद्वारे भाजपच्या कामगिरीची माहिती जनतेला करून दिली. मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणचे 1 ते 8 मे या कालावधीत पंतप्रधांनानी 21 जिल्ह्यांचा दौरा केला.  या जिल्ह्यातील 160 मतदारसंंघापैकी 84 जागा भाजपला मिळविणे शक्य झाले. मागील निवडणुकीत याच 160 मतदारसंंघातून भाजपला केवळ 38 जागा मिळाल्या होत्या. याखेपेला 46 अधिक जागा मिळाल्या. या मतदारसंंघातील  जनतेत मोदींच्या रॅलीचा प्रभाव किती खोलवर रुजला हे यावरून स्पष्ट होते.

दावणगिरी जिल्ह्यातील 8 मतदारसंघात 2013 मध्ये भाजपला केवळ एक जागा मिळाली होती. यंदा 6 जागा भाजपच्या पारड्यात पडल्या आहेत. किनारपट्टीवरील जिल्हे मंगळूर व उडुपीमध्ये भाजपने 2 वरून 12 जागांवर मुसंडी मारली आहे.

2013 मधील निवडणुकीत चामराजनगरमध्ये भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. याखेपेस एक जागा मिळाली आहे. गदग व कोप्पळ जिल्ह्यात भाजपला प्रत्येकी 3 जागा मिळाल्या.बिदरमध्ये मागील निवडणुकीप्रमाणे आताही एक जागा व चिकोडीमध्ये गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत एक जागा भाजपने मिळविली आहे.

विजापूर व बळ्ळारीमध्ये मागील वेळी केवळ प्रत्येकी एक जागा मिळविलेल्या भाजपने आता प्रत्येकी 3 जागा पटकाविल्या. गुलबर्गा, तुमकूरमध्ये प्रत्येकी एका जागेवरून प्रत्येकी 4 जागांवर झेप घेतली आहे. चित्रदुर्ग, बागलकोट व उडुपी जिल्ह्यात एक जागेवरून 5 जागांवर उडी घेतली आहे. शिमोगा येथे एका जागेवरून सहा  जागांवर, मंगळूरमध्ये एका जागेवरून सात जागांवर, हुबळी? धारवाडमध्ये दोन जागांवरून सात जागांवर तर रायचूरमध्ये दोन्ही जागा भाजपनेच मिळविल्या आहेत .चिक्कमंगळूरमध्ये  दोन जागांवरून 4 जागांवर झेप घेतली आहे. 

कुठे जय...कुठे पराजय

सर्वात मोठा जिल्हा व सर्वाधिक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेळगाव जिल्ह्यात भाजपला 10 जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकीत 8 मिळाल्या  होत्या. राजधानी बंगळूमधील हेब्बाळ व दासरहळ्ळी हे दोन्ही मतदारसंघ भाजपने गमाविले आहेत.चिक्कपेटमध्ये भाजपला मिळालेला विजय आश्चर्यकारक म्हटला जात आहे. कोलारमधील एक जागा मात्र भाजपला गमवावी लागली आहे.