Sun, May 26, 2019 08:35होमपेज › Belgaon › सुरक्षेपासून आरोग्यापर्यंत मोबाईल अ‍ॅपचा आधार

सुरक्षेपासून आरोग्यापर्यंत मोबाईल अ‍ॅपचा आधार

Published On: May 21 2018 1:11AM | Last Updated: May 20 2018 10:55PMबेळगाव : प्रतिनिधी

सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे. अ‍ॅप ही खूपच सामान्य बाब बनली आहे. मोबाईलवरील अ‍ॅपच्या आधारे घरबसल्या हवे ते मागवू शकतो. सुरक्षेपासून ते आरोग्यापर्यंत अ‍ॅपचा आधार घेतला जात आहे. शहरासह ग्रामीण भागात युवकांकडून याचा जास्त वापर होत आहे. 

जगभरात लाखो अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत. परंतु आता आपल्या शहरापुरतेही अ‍ॅप विकसित होऊ लागले आहेत. गेल्या दोन वर्षांत शहरामध्ये विविध सेवांसाठी अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. सुरक्षेपासून ते आरोग्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात अ‍ॅपचा वापर होत आहे. 

रेल्वे, बस, विमान तिकीट, हॉटेल  आरक्षण, अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाईल, डिश रिचार्ज करणे, इतरांच्या खात्यावर पैसे पाठविणे, बँकिंग अ‍ॅप,  वस्तू खरेदी करणे,  शैक्षणिक, भाषांतर, न्यूज अ‍ॅप, खरेदी आणि विक्री अ‍ॅप आदीचा सर्रास वापर केला जातो. फॅमिली डॉक्टर, मोठमोठे हॉस्पिटल्स या सर्वांचे अ‍ॅप आता नागरिकांच्या मोबाईलमध्ये आहेत. खासगी वाहतूक सेवेचेदेखील कित्येक अ‍ॅप मोबाईलमध्ये आहेत. संस्था, कंपनी, व्यवसायदेखील स्वतःच्या अ‍ॅपला प्राधान्य देत आहेत. 

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या अ‍ॅपबरोबर  स्थानिक पातळीवरील अ‍ॅप देखील मोबाईलमध्ये स्थान मिळवत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये काही अ‍ॅप आता अत्यावश्यक गरज बनले आहेत. अनेक अ‍ॅप इंटरनेटशिवाय चालणारे आहेत. कित्येक खासगी अ‍ॅप अँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन पॅकेजवरही चालतात. त्यांना गुगल प्ले स्टोअरचीही आवश्यकता नसते. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये किमान 10 तरी अ‍ॅप डाऊनलोड केलेले दिसतात.

व्यवसाय प्रचंड तेजीत

अ‍ॅपचा व्यवसाय सध्या प्रचंड तेजीत चालला आहे. शेकडो तरुणांचा हा व्यवसाय बनला आहे. अ‍ॅपची व्याप्ती व कार्यानुसार खर्च निश्‍चित केला जातो. दहा हजारांपासून ते 2 लाखांपर्यंतचे अ‍ॅप शहरात आहेत. अ‍ॅप जास्तीत जास्त मोबाईलमध्ये डाऊनलोड झाल्यास डाऊनलोडींगचे व जाहिरातीचे पैसे मिळतात. 

प्रत्येक तरुणाकडे मोबाईल आहे. मोबाईलमध्ये अनेक कंपन्यांचे अ‍ॅप असतात. रिचार्ज, तिकीट बुकिंग, आरोग्य, सुरक्षा, न्यूज आदी अ‍ॅपचा सर्रास वापर केला जातो. शहरात अ‍ॅप तयार करणार्‍या कंपन्या कार्यरत आहेत.   -राहुल शहापूरकर, आयटी इंजिनिअर