Mon, Aug 19, 2019 18:43होमपेज › Belgaon › विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन हजेरीसाठी मोबाईल अ‍ॅप

विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन हजेरीसाठी मोबाईल अ‍ॅप

Published On: Aug 12 2018 1:01AM | Last Updated: Aug 11 2018 11:09PMबेळगाव : प्रतिनिधी

सरकारी शाळांमधील ऑनलाईन हजेरीसाठी मोबाईल अ‍ॅप्लीकेशन आणि सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. याचा प्रायोगिक वापर लवकरच केला जाणार आहे.

राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्राने अ‍ॅप तयार केले आहे. बंगळूरनंतर राज्यातील सर्व शाळांमध्ये याचा वापर केला जाणार आहे. शिक्षण खात्याकडे उपलब्ध माहितीनुसार राज्यात 43,712 सरकारी प्राथमिक, 4,681 माध्यमिक अशा एकूण 58,393 शाळा आहेत. प्राथमिक शाळेत 38,60,302 आणि माध्यमिक शाळेत 5,97,332 असे एकूण 44,57,535 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

एकूण शाळांपैकी 50 टक्के शाळा ग्रामीण भागात आहेत. यापैकी बहुतेक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. अशा शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन जाणून घेणे शक्य नाही. त्यामुळे अशा ठिकाणी अ‍ॅप्लीकेशनद्वारे ऑनलाईन हजेरी नोंदविता येणार आहे. 

शिक्षण खाते आणि सार्वजनिक शिक्षण अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात 10 हजार शाळांमध्ये ऑनलाईन हजेरीची व्यवस्था केली जाणार आहे. विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन नोंदविल्याने बंगळुरातील अधिकार्‍यांना तेथेच बसून राज्यातील सर्व शाळांवर नियंत्रण ठेवता येणार आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती आणि ट्रॅकिंग सिस्टीमचाही त्यासाठी उपयोग होणार आहे.

संगणकाद्वारे विद्यार्थ्यांची हजेरी नोंदविणे शक्य नसलेल्या शिक्षकांना मोबाईल अ‍ॅप्लीकेशन दिले जाणार आहे. त्यांना दिलेल्या युजर नेम आणि पासवर्डद्वारे ऑनलाईन हजेरी भरता येणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील सर्व क्‍लस्टर्समधील विद्यार्थ्यांची हजेरी यामध्ये पाहता येणार आहे. यातील माहिती सर्वांनाच पाहता येत असल्याचा याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्याबाबतही उपायोजना करण्यात आली आहे.

शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी

वेळेत हजर राहण्याची सूचना शिक्षकांना अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, याची 100 टक्के अंमलबजावणी झालेली नाही. त्यावर बायोमेट्रिक हजेरीचा पर्याय अवलंबण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यांच्या हजेरीसाठी टॅब किंवा मिनी लॅपटॉप खरेदी करण्यात येणार आहेत. त्याकरिता लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत.