Wed, Mar 20, 2019 12:51होमपेज › Belgaon › मोबाईल, इंटरनेटमुळे लुप्त होत आहे पत्रप्रपंच

मोबाईल, इंटरनेटमुळे लुप्त होत आहे पत्रप्रपंच

Published On: Jul 27 2018 1:24AM | Last Updated: Jul 26 2018 11:23PMबेळगाव : प्रतिनिधी

सध्याच्या कुरीअर, मोबाईल, इंटरनेटच्या युगात डाक विभागाला फटका बसला आहे. पूर्वी पत्र हे संदेश पाठवण्याचे महत्त्वाचे साधन होते. मात्र, काळाच्या ओघात पत्रव्यवहार लुप्त होत असून त्याची जागा आता मोबाईलने घेतली आहे. विशेषतः इंटरनेटच्या या युगात जग इतके जवळ झाले आहे की त्यामुळे पत्र, पोस्टमन, पत्रपेट्या या सार्‍या गोष्टी इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत, किमान वैयक्तिक संदेश वहनात तरी. मोबाईल, इंटरनेटमुळे घटतोय पत्रप्रपंच असेच चित्र सगळीकडे आहे.

मोबाईलमुळे माणसे थेट एकमेकांशी बोलू लागली. कोसोदूर असलेल्या माणसाशीही एका क्षणात संपर्क होऊ लागला. हळूहळू इंटरनेटचा शोध लागला. त्यामुळे माणसे अजूनच जवळ आली. इंटरनेच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर कोठेही असलेल्या व्यक्तीशी संपर्क करणे सोपे झाले आहे. संदेशाची नवनवीन साधनेही आली. मात्र, आजही माणसांच्या मनात पत्राच्या आठवणी ताज्या असल्याने वास्तव मात्र, बदलले नाही. 

गावात पोस्टमन आला तरी नागरिकांची त्यांच्याभोवती होणारी गर्दी ठरलेली असायची. आमचं काय आहे का? आमचं पत्र आलंय का? आमची मनीऑर्डर आलीय का? असे पोस्टमनला विचारले जात होते. त्यामुळे पोस्टमनलाही विशेष महत्व होते. मात्र, सध्याच्या काळात ग्रामीण भागात क्वचितच असे चित्र दिसून येते.
तरीही आकडा मोठा
बेळगाव मुख्य डाक कार्यालयातून रोज  15 हजार टपाल, 500 ते 600 स्पीड स्पोस्ट, 800 ते 900 रजिस्टर,  1000 मनीऑर्डर पाठविल्या जातात. हा आकडाही मोठा आहे. मात्र यामध्ये एलआयसी, नोटीस, लाईट बिल आदींचा समावेश अधिक असतो. वैयक्तिक पत्रांचा समावेश खूपच कमी आहे.