Wed, Jul 17, 2019 16:45होमपेज › Belgaon › मोदी सरकारकडून देश जोडण्याचे काम 

मोदी सरकारकडून देश जोडण्याचे काम 

Published On: Feb 11 2018 12:54AM | Last Updated: Feb 10 2018 10:37PMबेळगाव : प्रतिनिधी

गेल्या सत्तर वर्षांत न झालेल्या विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम भाजपप्रणित केंद्र सरकार करत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्वप्नातील ‘कनेक्ट इंडिया’ द्वारे देशाला जोडण्याचे काम मोदी सरकार करत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे आणि कोळसा खाण मंत्री पियुष गोयल यांनी केले.

शनिवारी (दि. 10) उद्यमबाग येथील बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला ना. पियुष गोयल यांच्यासह खा. सुरेश अंगडी, आ. संजय पाटील, दक्षिण रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्‍ता, चेंबरचे अध्यक्ष उमेश शर्मा, उपाध्यक्ष रोहन जुवळी व सुनील चौगुले व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी चेंबर्स आणि विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी ना. गोयल यांना निवेदन सादर केले. 

ना. गोयल म्हणाले, देशात गेल्या सत्तर वर्षांपासून विविध समस्या कायम आहेत. त्या समस्या दूर करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. कर्नाटक राज्याला देण्यात येणार्‍या निधीत दुप्पट वाढ करण्यात आली आहे.  उत्तर प्रदेश प्रमाणे बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या मोठी आहे. कर्नाटक राज्यातील शेतकरी अडचणीत असून आत्महत्या करत आहेत. त्याकडे लक्ष देऊन शेतकर्‍यांच्या हिताबरोबरच ऊस उत्पादकांची बिले वेळेवर मिळावीत, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.

चांगले उत्पादन, योग्य किंमत आणि चांगली सेवा हेच ‘मेक इन इंडिया’चे ध्येय आहे. ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून स्पर्धेच्या युगात उद्योजक यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. जीएसटी करप्रणाली सर्वांसाठी सोयीची आणि किफायतशीर आहे. मात्र, नवी करप्रणाली समजावून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल.

जीएसटीमुळे कर चुकवेगिरीला चाप बसला आहे. आयुष्यमान भारत योजनेतून देशातील 50 कोटी जनतेला मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. खा. अंगडी म्हणाले, बेळगावच्या उद्योगाने आंतरराष्ट्रीय क्षेत्रासह अंतराळातही झेप घेतली आहे. त्यामुळे विदेशी कंपन्यांना पायघड्या घालण्याऐवजी स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. मात्र, त्यामानाने कर्नाटक सरकार स्थानिक उद्योजकांना वाव देत नाही. प्रारंभी मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. उमेश शर्मा यांनी स्वागत तर, दिलीप तिळवे यांनी निवेदन वाचन केले. रोहन जुवळी यांनी आभार मानले.