Tue, Jun 18, 2019 22:25होमपेज › Belgaon › ‘मध्यान्ह’मुळे विषबाधा 

‘मध्यान्ह’मुळे विषबाधा 

Published On: Jun 21 2018 1:26AM | Last Updated: Jun 20 2018 11:11PMरामदुर्ग : वार्ताहर 

मध्यान्ह आहारातून विषबाधा झाल्याने प्राथमिक शाळेतील 60 विद्यार्थी बुधवारी अत्यवस्थ झाले. त्यापैकी 4 गंभीर आहेत. लखनायनकोप्प (ता.रामदुर्ग) येथे प्रकार घडला. विद्यार्थ्यांना बुधवारी दुपारी मध्यान्ह आहारातून पुलाव  देण्यात  आला होता.  पुलाव खाल्ल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना पोटदुखी तर काहींना उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे शिक्षकांची धावपळ उडाली. अत्यवस्थ विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

मध्यान्ह आहारासाठी वापरण्यात येणारा तांदूळ धुतला जात नाही. तांदळातील खडे, अळ्या  काढल्या जात नाहीत. तांदूळ तसाच शिजवला जातो. शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळा आहार बनविण्यात येतो, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

डॉ. विद्यावती अम्मीनभावी उपचार करत आहेत. गंभीर असलेल्या चार  विद्यार्थ्यांना दाखल करून घेण्यात आले असून, उर्वरित विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. कोणाच्याही जीवाला धोका नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.

वृत्त समजातच विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्राथमिक उपचार केंद्राकडे धाव घेतली. रामदुर्गचे आ. महादेवप्पा यादवाड, जि.पं.सदस्य रेणप्पा सोमगोंड, मल्लण्णा यादवाड यांनीही विद्यार्थ्यांची भेट घेऊन विचारपूस केली. काही शाळांत मध्यान्ह आहार बनविणारे कर्मचारी शिस्त, स्वच्छता पाळत नाहीत. त्यामुळे अन्नातून विद्यार्थ्यांचे पोट बिघडण्याचे प्रकार घडत आहेत.