Wed, Apr 24, 2019 12:08होमपेज › Belgaon › बंदचा फटका; ३२ लाखांचा तोटा

बंदचा फटका; ३२ लाखांचा तोटा

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 28 2017 8:59PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

म्हादई पाणी प्रश्‍नासंबंधी  विविध शेतकरी संघटनांकडून बुधवारी  उत्तर कर्नाटक बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमुळे बेळगाव विभाग परिवहन महामंडळाला 32 लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे.  बेळगाव विभागातील बैलहोंगल, रामदुर्ग, खानापूर व शहरातील चार डेपो याठिकाणच्या बसेस बंद असल्यामुळे महसुलात घट झाल्याची माहिती परिवहन मंडळाचे नियंत्रणाधिकारी बसवानी जाधव यांनी दिली. 

शेतकर्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर शहरासह ग्रामीण भागातील बससेवा अचानक बंद करण्यात आली होती. यामुळे प्रवासी तसेच विद्यार्थ्यांना देखील नाहक त्रासाचा सामना करावा लागला. याचा सर्वाधिक फटका परिवहन महामंडळाला बसला असून  एक दिवसात 32 लाखांचा तोटा सहन करावा लागला आहे. 

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग, सौंदत्ती, बैलहोंगल व बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडीत शेतकर्‍यांनी बंद पुकारला होता. बस बंदमुळे प्रवाशांना इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला.  रिक्षाचालक व खासगी वाहतूकदारांकडून त्यांची मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली.  

सकाळी 10 पासून बसबंद असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शहरात शाळा, कॉलेजला जाणे टाळले. ग्रामीण भागातील बससेवेवर याचा जादा परिणाम झाला असून विद्यार्थी व प्रवाशांचे हाल झाले. ग्रामीण भागातील जनतेला बंद बाबत कोणतीही माहिती नव्हती. यामुळे या भागातील व्यवहार सुरळीत सुरु होते. तरीदेखील परिवहन महामंडळाने बुधवारी बससेवा ठप्प ठेवली. यामुळे तोट्यात भर पडली.