Thu, Jul 18, 2019 13:02होमपेज › Belgaon › भाजपच्या दबावाला पर्रीकर बळी?

भाजपच्या दबावाला पर्रीकर बळी?

Published On: Dec 22 2017 1:25AM | Last Updated: Dec 22 2017 12:10AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

म्हादईप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने गोवा सरकारवर दबाव आणला आहे. त्याचा बळी गोवा सरकार पडल्याचे दिसून येत असून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मानवतेच्या दृष्टीने पिण्याचे पाणी देण्यासंदर्भात चर्चा करण्यास सशर्त तयार असल्याचे पत्र भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष  येडियुराप्पा यांना पाठविले आहे.

म्हादईप्रकरणी 2002 पासून लवादाकडे पाणी वाटपाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. कर्नाटकाला पाणी मिळावे यासाठी उत्तर कर्नाटकातील शेतकर्‍यांनी सातत्याने आंदोलन छेडले आहे. यामुळे हे श्रेय पदरात पाडून घेण्यासाठी राज्य भाजप नेत्याकडून केंद्राच्या माध्यमातून गोव्यावर दबाव आणण्यात येत आहे. ही खेळी काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून येत असून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याबाबतचे पत्र येडियुराप्पा यांना गुरुवारी दिले आहे.

म्हादईप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत बुधवारी दिल्ली येथे चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्र्यासह गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा उपस्थित होते. 

यावेळी येडियुराप्पा यांनी पर्रीकर यांना पत्र दिले होते. त्याला गुरुवारी उत्तर देण्यात आल्याची माहिती येडियुराप्पा यांनी भाजपच्या हुबळी येथील परिवर्तन यात्रेत दिली. या पत्रामध्ये पर्रीकर यांनी उत्तर कर्नाटकातील जनतेला भेडसावणार्‍या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यास आपण तयार असल्याचे  उत्तर दिले आहे. 

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका चार महिन्यांत होणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपकडून म्हादई प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याचा फायदा निवडणुकीत  होईल, असा अंदाज भाजकडून वर्तविला जात आहे.