Thu, Jul 18, 2019 04:22होमपेज › Belgaon › ‘पुढारी’कडून मिळणारा सन्मान अभिमानास्पद

‘पुढारी’कडून मिळणारा सन्मान अभिमानास्पद

Published On: Mar 09 2018 1:33AM | Last Updated: Mar 09 2018 12:04AMबेळगाव : प्रतिनिधी

स्त्री-पुरुष ही समाजरथाची दोन चाके आहेत. दोन्ही चाके एकत्र पुढे गेली तर विकास होऊ शकतो. आज पुरुषांच्या बरोबर महिलांनीदेखील प्रत्येक क्षेत्रात आपलेे वर्चस्व निर्माण केले आहे. चूल मूल सांभाळत महिला घराबाहेर पडून वर्तमानपत्राची विक्री करत आहेत. अशा महिलांच्या सन्मानाचा कार्यक्रम दै. ‘पुढारी’ कार्यालयात आयोजित करण्यात आला,  ही महिलांसाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन उपमहापौर मधुश्री पुजारी यांनी केले. 

जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून दै. ‘पुढारी’ने महिला वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान केला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपमहापौर मधुश्री पुजारी उपस्थित होत्या. नगरसेवक राकेश पलंगे, निवासी संपादक गोपाळ गावडा, ब्यूरो मॅनेजर बाळासाहेब नागरगोजे, साहाय्यक वितरण व्यवस्थापक अमर पाटील व्यासपीठावर होते.उपमहापौर पुजारी म्हणाल्या, महिलांनी वर्तमानपत्र विक्री व्यवसाय करत नवा आदर्श उभा केला आहे. या सन्मानपत्रामुळे त्यांना नवी प्रेरणा, ऊर्जा मिळेल. इतर महिलांसाठी त्यांचे कार्य आदर्श ठरेल. 

यावेळी वृत्तपत्र विक्रेत्या संध्या टिंबरे (बेळगाव), महेश्वरी भातकांडे (बेनकनहळ्ळी), सुनीता सरवदे (बेळगाव), रूपाली कुंभार (होनगा), कलावती दोनवाडे (संकेश्वर), दीपा कदम (बेळगाव), शिवानी खडपे, सुरेखा खडपे (खानापूर), रेणु बन्ने (सौंदलगा), शोभा सुतगट्टी (काकती), तेजस्विनी सुतगट्टी (काकती), प्रिया बिडकर (नंदगड) या महिलांचा उपमहापौर पुजारी यांच्या हस्ते सन्मानपत्र व रोपटे देऊन गौरव करण्यात आला.  

प्रस्तावनेत गावडा म्हणाले, घरचे काम सांभाळत तुम्ही वृत्तपत्र विक्रीचे काम करता, ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक वाचकापर्यंत सकाळच्या प्रहरी तुम्ही वृत्तपत्र पोहचविता. या योगदानाची दखल घेऊन ‘पुढारी’ परिवारातर्फे सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 

‘पुढारी’ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले. ‘पुढारी’ने नवी ऊर्जा देण्याचे काम केले आहे, असे सांगून आभार मानले. ‘पुढारी’ परिवाराशी आमचे स्नेहबंध आणखी घट्ट झाल्याचेही मत व्यक्त केले. स्वागतगीत वितरण प्रतिनिधी गजानन वर्णे यांनी सादर केले. अमर पाटील यांनी आभार मानले.