Mon, Sep 24, 2018 05:14होमपेज › Belgaon › सीमाप्रश्नी वकिलांची बैठक आठवडाभरात

सीमाप्रश्नी वकिलांची बैठक आठवडाभरात

Published On: Jan 08 2018 1:17AM | Last Updated: Jan 08 2018 1:17AM

बुकमार्क करा
बेळगाव: प्रतिनिधी

सीमाखटल्याच्या सुनावणीची पुढची तारीख लवकरच निश्चित होणार असून, त्यासाठी वकिलांची दिल्लीत लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीला ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि सीमाखटल्यातील मुख्य वकील अ‍ॅड. हरिष साळवे उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वादाचे मुद्दे निश्चित झाल्यानंतर सीमाखटला आता साक्षीदारांच्या यादीपर्यंत पोचला आहे. महाराष्ट्राच्या बाजूने चार साक्षीदारांची प्रतिज्ञापज्ञे तयार करण्यात आली आहेत. त्यांना अंतिम स्वरुप देण्याचे काम सुरू आहे. तर कर्नाटकही आपल्या साक्षीदारांची प्रतिज्ञापत्रे तयार करण्याच्या प्रक्रियेत मग्न आहे. पुढच्या सुनावणीवेळी महाराष्ट्राच्या बाजून चारही साक्षीदारांची प्रतिज्ञापत्रे न्यायालयाला सादर केली जाण्याची शक्यता आहे.

ती सादर करावी किंवा कसे याबाबत चर्चा करण्यासाठीच अ‍ॅड. साळवे यांच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीत वकिलांची बैठक होईल. त्या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अ‍ॅड. शिवाजी जाधव हे महाऱाष्ट्रातर्फे ‘अ‍ॅड ऑन रेकॉर्ड’ (दैनंदिन कामकाजासाठी मदत करणारे वकिल) असून, तेच ही बैठक आयोजित करतील. त्या बैठकीनंतर अ‍ॅड. साळवे सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाची वेळ घेऊन महाराष्ट्राची बाजू मांडतील.

सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समितीची बैठक गेली दोन वर्षे झालेली नाही. त्यामुळे ही बैठकही घेऊन कायदेपथकाला सूचना द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आली आहे.