Sat, Sep 22, 2018 21:19



होमपेज › Belgaon › बड्या नेत्यांच्या दौर्‍यांनी वाढली चुरस

बड्या नेत्यांच्या दौर्‍यांनी वाढली चुरस

Published On: May 04 2018 1:53AM | Last Updated: May 04 2018 12:49AM



बेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडणार्‍या जारकीहोळी घराण्याचे वर्चस्व असणारा गोकाक मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ढवळून निघाला आहे. गोकाक मतदारसंघात बड्या नेत्यांनी सभा घेऊन लढतीमध्ये  चुरस निर्माण केली आहे. पालकमंत्री रमेश जारकीहोळींसमोर आव्हान निर्माण झाले आहे ते त्यामुळेच.

हा मतदारसंघ  अतिसंवदेनशील म्हणून ओळखला जातो. इथे जारकीहोळी बंधुचे वर्चस्व असून त्याला छेद देण्याची जोरदार तयारी भाजपने चालविली आहे.

गोकाकमधून पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे सलग चारवेळा निवडून आले आहेत. पाचव्यावेळी आपले नशीब आजमावण्यासाठी ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आजवरच्या निवडणुकामध्ये या मतदारसंघात एकदाही भाजपला यशाने साथ दिलेली नाही. दोनवेळा जनतादलाचा अपवाद वगळता हा मतदार संघ सातत्याने काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्याचबरोबर मागील अनेक वर्षापासून जारकीहोळीं बंधूंनी आपल्या नावाचा दबदबा या भागात निर्माण केलेला आहे. 

भाजपने या मतदारसंघ काँग्रेसकडून हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. आजवर निजदमधून रमेश जारकीहोळी यांना मागील दोन विधानसभा निवडणुकीत टक्कर दिलेले अशोक पुजारी सध्या भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. ते भाजपकडून उभे ठाकले आहेत.भाजपने माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची सभा घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र सदर सभा अमित शहा यांचा दौरा स्थगित झाल्याने ऐनवेळी रद्द झाली. येत्या पाच दिवसांत पंतप्रधान मोदी बेळगावात येणार आहेत. त्यावेळी गोकाकमध्ये सभा होण्याची शक्यता आहे. 

रमेश जारकीहोळी यांनीही आपल्या विजयासाठी कसून प्रयत्न चालविले आहेत. यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सभा घेवून मतदारांना आवाहन केले आहे. बड्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावल्यामुळे या राजकीय भागातील वातावरण तापले आहे.निजदतर्फे करीयप्पा तळवार पक्षाची  खिंड लढवत आहेत. त्यांची मदार पक्षाच्या परंपरागत मतदारावर आहे. त्यांच्या साथीने ते आपले नशीब आजमावून पाहात आहेत.

मतदारसंघात बेरड समाजाची मते लक्षणीय आहेत. या समाजाने नेहमीच जारकीहोळींनी साथ दिली आहे. यामुळे अन्य पक्षांना विजयासाठी झगडावे लागले आहे. त्याचबरोबर लिंगायत, धनगर, मुस्लिम मतेदेखील अधिक आहेत. त्यांच्या पाठिंब्यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत. शेवटच्या टप्प्यात राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. आरोप-प्रत्यारोप होणार आहेत. यामुळे मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.  याठिकाणी अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक असली तरी खरी लढत रमेश जारकीहोळी व अशोक पुजारी यांच्यामध्येच होणार आहे. अन्य उमेदवार किती मते घेणार हे पाहावे लागणार आहे.