Thu, Aug 22, 2019 12:50होमपेज › Belgaon › जिल्ह्यासाठी लीड बँकेचा १५ हजार कोटींचा कृती आराखडा

जिल्ह्यासाठी लीड बँकेचा १५ हजार कोटींचा कृती आराखडा

Published On: Mar 24 2018 1:46AM | Last Updated: Mar 23 2018 8:58PMबेळगाव : प्रतिनिधी

केंद्र सरकारने शेती व्यवसाय  अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत. शेतकर्‍यांचे उत्पादन दुप्पट व्हावे, उत्पन्न वाढावे, या उद्देशाने प्रधानमंत्री योजनेतून जिल्ह्यासाठी 15350.62 कोटी रु.ची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून हा निधी वितरित करण्यात येणार असून कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती ‘नाबार्ड’चे साहाय्यक सरव्यवस्थापक ए. जी. माविनकुरवे यांनी दिली. 

जि. पं. सभागृहामध्ये लीड बँकेच्या अंतर्गत येणार्‍या बँक प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर लीड बँकेचे व्यवस्थापक बी. नागराजू होते. 

शेतकर्‍यांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. उत्पादन क्षमता वाढावी, आवश्यक कृषी साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने सरकारने आर्थिक तरतूद केली आहे. 2018-19 या वर्षाकरिता जिल्ह्यासाठी 15350.62 कोटीची तरतूद केली आहे. या माध्यमातून शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. बँकांनी नियोजित उद्दिष्ट यशस्वीपणे गाठावे आणि शेतकर्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. 

2018-19 करिता बेळगाव जिल्ह्यासाठी तयार केलेला कृती आराखडा पुढीलप्रमाणे आहे. पीक उत्पादन, त्याची जोपासना आणि विक्री (पीक कर्ज) स्वरूपात 6427.32 कोटी, कृषी आणि संबंधित उपक्रमासाठी कर्ज  2961.38 कोटी, कृषीसाठी मूलभूत सुविधा देण्यास 373.52 कोटी, यासाठी पूरक ठरणार्‍या उपक्रमासाठी 335.38 कोटी, कृषीसाठी आर्थिक मदत 10097.60 कोटी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 1678.01 कोटी, निर्याती खर्चासाठी 76.50 कोटी, शिक्षण 300.15 कोटी, वसती 462.42 कोटी, नूतनीकरणासाठी 30.05 कोटी, सामाजिक मूलभूत सुविधांसाठी 634.50 कोटी अशा प्रकारे 15350.62 कोटीची तरतूद केली आहे. सरकारने दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी बँकांनी परिश्रम घ्यावेत, असे आवाहन माविनकुरवे यांनी केले. 

दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच असा उपक्रम घेतला असून यासाठी  गोकाक ब्लॉकची निवड करण्यात आली आहे. विभाग विकास योजना (एरिया डेव्हलपमेंन्ट स्किम) या योजनेंतर्गत गोकाक भागातील दुग्ध व्यवसाय करणार्‍या डेअरींचा विकास करण्यात येणार आहे. उत्पादन करण्यात आलेल्या दुधाच्या संकलनासाठी आवश्यक दूध संकलन कुलिंग युनिट उभारण्यासाठीही मदत करण्यात येणार आहे. याकडे विशेष लक्ष राहणार आहे. या माध्यमातून वारंवार अहवाल घेण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर जिल्हाभरात राबविण्यात येईल, अशी माहिती माविनकुरवे यांनी दिली. यावेळी विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

Tags : belgaon, belgaon news, Pradhan Mantri Yojana, bank, Lead Bank,