Tue, Jul 16, 2019 00:19होमपेज › Belgaon › नैराश्य झटका, चला लढू!

नैराश्य झटका, चला लढू!

Published On: Jun 01 2018 1:43AM | Last Updated: Jun 01 2018 12:08AMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामुळे कार्यकर्त्यामध्ये काही प्रमाणात नैराश्य निर्माण झाले आहे. जनतेने आपल्याला का नाकारले याचा विचार करावा लागणार आहे. मात्र पराभवाच्या गर्तेत अधिक काळ न राहता आपण जितक्या लवकर लढ्यासाठी सिद्ध होवू, तितक्या प्रमाणात विरोधकांना धक्‍का बसेल. यामुळे कार्यकर्त्यांनी नैराश्य झटकून पुन्हा लढयाला सिद्ध व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले.

मराठा मंदिर येथे गुरुवारी मध्यवर्ती म. ए. समितीची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी दळवी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अपयशाबद्दल चर्चा केली. दळवी म्हणाले, पराभवानंतर पुन्हा एकदा आपण ताकदीने उभे राहावे लागणार आहे. पराभवाचे खापर ऐकमेकाविरोधात फोडण्यापेक्षा लढ्यासाठी नव्याने सिद्ध होवूया. यासाठी घटक समितींची पुनर्रचना करावी लागेल. जिंकलेल्यांच्या मनात धडकी भरेल असे काम करावे लागणार आहे.

निवडणूक काळात काहींनी लोकामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून जनतेची मते बदलत गेली. काहींना सीमाप्रश्न न्यायालयात आहे, त्यामुळे लढ्याची आवश्यकता नाही असा  चुकीचा समज झाला आहे. कदाचित पराभव करून जनतेनेच आम्हाला विचार करायला भाग पाडायला लावले असावे. 

माजी आ. अरविंद पाटील म्हणाले, मध्यवर्ती म. ए. समितीने कठोर निर्णय आवश्यक आहेत. बंडखोरांना जवळ करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांना वाव मिळेल. काहीजण युवा समिती स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये ग्रामीण व खानापूर म. ए. समितीचे किती कार्यकर्ते आहेत. केवळ शहरातील कार्यकर्त्यांनी ग्रामीण आणि खानापूरच्या कार्यकर्त्यांना गृहीत धरून निर्णय घेवू नयेत. 

निवडणूक काळात बंडखोरांनी पैसे वाटप करून मते मिळविण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात त्यांचा उघड हात आहे. मागील निवडणुकीतही त्यांनी आपल्या विरोधात काम केले होते. ता. म. ए. समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार म्हणाले, समिती उमेदवारांचा झालेला पराभव प्रत्येकाच्या जिव्हारी लागलेला आहे. परंतु, निराशेने खच्चून न जाता पुन्हा एकदा उभे राहण्याची आवश्यकता आहे.

यावेळी सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे , अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, राजू मरवे, एल. आय. पाटील, ता. पं. सदस्य रावजी पाटील, नगरसेवक विजय पाटील, अ‍ॅड. ईश्‍वर मुचंडी, एस. एल. चौगुले, डी. बी. आंबेवाडीकर आदीसह मध्यवर्तीचे सदस्य उपस्थित होते. 

किणेकर अनुपस्थित

आजच्या बैठकीला कार्याध्यक्ष मनोहर किणेकर अनुपस्थित होते. त्यांनी मध्यवर्तीच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय त्यांनी तालुका समितीच्या बैठकीत जाहीर केला होता. तथापि, किणेकरांनी राजीनामा देऊ नये, अशी सूचना ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी गेल्या आठवड्यात मध्यवर्तीच्या नेत्यांनी कोल्हापूरला त्यांची भेट घेतली असता दिली. त्यानुसार किणेकरांनी राजीनामा देऊ नये, असा सूर नेत्यांनीही व्यक्त केला.