Tue, Mar 19, 2019 03:51होमपेज › Belgaon › मनपा बैठक महिनाअखेर?

मनपा बैठक महिनाअखेर?

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 8:54PMबेळगाव : प्रतिनिधी 

विधानसभा  निवडणुकीमुळे बेळगाव मनपातील नागरिकांची अनेक कामे खोळबंली आहेत. आता  निवडणूक संपलेली असून आचारसंहिताही 18 मे रोजी समाप्त झाली आहे. त्यामुळे आता मनपा आयुक्तांनी नागरिकांच्या विविध कामांच्या फाईली निकालात काढण्याची आवश्यकता आहे. या महिनाअखेरीस सर्वसाधारण बैठकही बोलावली जाण्याची शक्यता आहे.स्मार्टसिटी योजना तसेच मनपाच्या विकासकामांना चालना देण्यासाठी ही बैठक होईल. यासंदर्भात महापौर बसाप्पा चिक्कलदिनी यांच्याशी संपर्क साधता ते म्हणाले, मेअखेरपर्यंत सर्वसाधारण बैठक घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मनपाची तातडीने बैठक घेऊन विकासकामांना चालना देण्याची मागणीही नगरसेवकांनी केली आहे. सर्वसाधारण बैठकीची तारीख निश्‍चित करण्यासाठी आपण कौन्सिल सेक्रेटरी लक्ष्मी निपाणीकर यांना सांगितलेले असून त्यावर चर्चेनंंतर लवकरच बैठक आयोजित केली जाईले.

मनपाची याआधीची सर्वसाधारण बैठक 23 मार्च रोजी झाली होती. महापौर बसाप्पा चिक्कलदिनी यांची ती पहिलीच बैठक होती. त्यानंतर 27 मार्चपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून मनपाची विकासकामे रखडली होती. त्याशिवाय पावसाळापूर्व कामेही खोळंबली आहेत. बांधकाम परवाने देण्याचे काम ठप्पच आहे. सर्वांत महतत्वाचे म्हणजे घरपट्टी भरुन घेण्याचे काम ठप्प झाले होते. एप्रिल महिन्यात चलन मिळूनही बेळगाववासीयांना एप्रिल महिन्यात घरपट्टी भरता आली नाही. याचा फटका त्यांना बसला. कारण एप्रिलमध्ये घरपट्टी भरल्यास 5 टक्के सूट मिळते. या सवलतीपासून यंदा अनेक मालमत्तामालक दूर राहिले. त्याबाबत तक्रारही करण्यात आली आहे.

आयुक्त रजेवर

मनपा आयुक्तांनी आता प्रलंबित कामांना चालना देण्याचे कामकाज सुरू केले आहे का? या प्रश्‍नाला उत्तर देताना महापौर चिक्कलदिनी म्हणाले, सध्या मनपा आयुक्त कृष्णेगौडा तायण्णावर हे दोन दिवसांच्या रजेवर आहेत. रजेनंतर  ते मनपाच्या प्रलंबित फाईल्स निकालात काढण्याचे कामकाज हाती घेतील. 

अधिकारी रुजू

आयुक्त रजेवर असले तरी मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी ड्युटीवर हजर झालेले असून ते आपले दैनंदिन कामकाज करून महत्त्वाच्या फाईल्स मनपा आयुक्तांच्या मंजुरीसाठी त्यांच्याकडे पाठवून देत आहेत. स्मार्ट सिटी योजनेमध्ये बेळगाव शहरासाठी 24 तास पाणी जागतिक बँकेच्या सहाय्याने पुरवण्यात येणार आहे. 630 कोटीची ही योजना आहे. ही योजना अंमलात आणण्यासाठी कर्नाटक शहर मूलभूत विकास व अर्थमहामंडळाने दोन वेळा जागतिक निविदा काढल्या. पहिल्या वेळेला मलेशिया कंपनीने कंत्राट स्वीकारली होते. परंतु ऐनवेळी या कंपनीने माघार घेतली होती. त्यानंतर पुन्हा जागतिक निविदा काढण्यात आली. परंतु त्यावेळी कोणतीच कंपनी पुढे आली नाही. त्यामुळे कर्नाटक शहर मूलभूत विकास व अर्थमहामंडळाला तिसर्‍यांदा निविदा काढण्याची वेळ आलेली आहे.