Thu, Apr 25, 2019 17:32होमपेज › Belgaon › सावगावात उद्या महिला आघाडीचा मेळावा

सावगावात उद्या महिला आघाडीचा मेळावा

Published On: Jan 20 2018 1:38AM | Last Updated: Jan 19 2018 11:04PMबेळगाव : प्रतिनिधी

तालुका म. ए. समितीच्या महिला आघाडीचा मेळावा आणि हळदीकुंकू समारंभ सावगाव येथे रविवार दि. 21 रोजी सकाळी 11 वा. आयोजित केला आहे.  तालुक्यातील महिला एकवटणार असून यावेळी कोल्हापूरचे खा. धनंजय महाडिक यांच्या सुविद्य पत्नी अरुंधती महाडिक व प्रा. गीता मुरकुटे (कार्वे) उपस्थित राहणार आहेत.

महिला मेळावा गणेशपूर येथील सावित्रीबाई फुले ग्रामीण महिला सोसायटी आणि ओमकार सोसायटी सावगाव यांच्या संयुक्‍त विद्यमाने सावगाव येथील महादेव मंदिर मैदानात मेळावा पार पडणार आहे. यासाठी तालुक्यात जागृती मोहीम हाती घेण्यात आली असून त्याला व्यापक प्रतिसाद लाभत आहे. कार्यक्रमाला सुमारे 3 हजारहून अधिक महिला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या लता पावशे तर स्वागताध्यक्षा म्हणून माजी जि. पं. सदस्या प्रेमा मोरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी  जि. पं. सदस्या माधुरी हेगडे, ता. पं. सदस्या निरा काकतकर, सावगाव महिला आघाडी अध्यक्षा सुनीता कोरजकर, महिला मंडळ अध्यक्षा शकुंतला पाटील या व्यासपीठावर राहणार आहेत.

ता. म. ए. समितीने 12 रोजी बेनकनहळ्ळी येथे युवा मेळावा घेतला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे उत्साह दुणावल्याने महिला आघाडीचा मेळावा सावगाव येथे आयोजित केला आहे. याबाबत तालुक्यात उत्सुकता लागून राहिली आहे. मेळाव्याच्या जागृतीसाठी बुधवारपासून जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये माजी जि. पं. सदस्या प्रेमा मोरे, ता. पं. सदस्या निरा काकतकर, माजी ता. पं. सदस्या मीनाक्षी वेताळ, तुळसा पाटील, सुनीता पावशे, गीता सावंत, लक्ष्मी कदम, मीना लोहार, ज्योती गवी आदी  सहभागी झाल्या.

महिला आघाडीच्या वतीने निलजी, सांबरा, मुतगा, बसरीकट्टी, मोदगा, बस्तवाड, हालगा, धामणे, मास्कोनहट्टी, येळ्ळूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी आदी भागात जागृती केली आहे. हा मेळावा तालुक्यातील महिलांना एकत्रित करण्यासाठी आयोजित केला आहे. या माध्यमातून महिलांनी एकत्रित येऊन विचारांची देवाण-घेवाण करावी, मराठी भाषा, संस्कृती व परंपरेची जपणूक करावी, महिलावर होणार्‍या अत्याचाराला वाचा फोडावी, या उद्देशाने मेळावा आयोजित केला आहे.