Fri, Aug 23, 2019 22:15होमपेज › Belgaon › म. ए. समिती नेत्यांनो एक व्हा!

म. ए. समिती नेत्यांनो एक व्हा!

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 15 2018 11:27PMबेळगाव : प्रतिनिधी

म. ए. समिती नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या बेकीमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांचे नुकसान होत आहे. मराठी माणूस गटातटात विखुरला जात आहे. मराठी हितासाठी नेत्यांनो एकत्र या, अशी हाक मराठी युवकांनी दिली आहे. उपरोक्‍त मागणीचे निवेदन गुरुवारी मध्यवर्ती, शहर आणि तालुका म. ए. समिती नेत्यांना देण्यात आले. नेत्यांनी एकीबाबत सकारात्मक प्रयत्न करण्याची मागणी केली.

समिती नेत्यांच्या एकीबाबत मराठी युवकांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी पंधरा दिवसांपासून अभियान राबविण्यात येत असून मराठा मंदिरमध्ये पहिली बैठक घेण्यात आली. याला युवकांचा चांगला प्रतिसाद लाभला. यानंतर कोरे गल्ली, शहापूर येथील पंच कमिटीने पुढाकार घेऊन एकीची मागणी केली.

मराठी युवकांनी नेत्यांना निवेदने देण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार गुरुवारी जत्तीमठ येथून याचा प्रारंभ करण्यात आला. नंतर मध्यवर्ती व शहर म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, तालुका म. ए. समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार, महापौर संज्योत बांदेकर, मनपा गटनेते पंढरी परब, वाय. बी. चौगुले, मनोज पावशे, किरण गावडे यांना निवेदन दिले.

निवेदनामध्ये मराठी नेत्यांना आवाहन केले आहे. 62 वर्षांपासून एकाच ध्येयाने लढत आहोत. म. ए. समिती या नावाची ढाल करून अनेक संकटांना आपण सामोरे गेलो. आजच्या काळातही एकच उद्देश समोर ठेवून हजारो युवक समितीशी प्रामाणिक आहेत. आजही समिती हाच येथील युवकांचा ध्यास आणि स्वाभिमान आहे. आपल्यातील हेवेदावे चर्चेने बाजूला काढून सगळे एकत्र येण्याची आवश्यकता आहे. मराठी हितासाठी एकत्र या. मराठी जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण करा. दुभंगलेल्या मनांना सांधा, अशी विनंती केली आहे. 

यावेळी पीयूष हावळ, श्रीकांत कदम, मदन बामणे, सूरज कुडुचकर, सुनील बाळेकुंद्री, शुभम शेळके, चंदू पाटील, बापू भडांगे, मोतेश बारदेसकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.