Tue, Jul 16, 2019 11:38होमपेज › Belgaon › वैद्यकीय कचरा सर्वसामान्यांच्या जीवावर

वैद्यकीय कचरा सर्वसामान्यांच्या जीवावर

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 10 2018 7:59PM

बुकमार्क करा
निपाणी : मधुकर पाटील

प्रगत औषधौपचार योग्य असला तरी यातला वैद्यकीय कचरा मानवी जीवाला धोकादायक ठरत आहे. शहरातला हा कचरा उचलला जात असला तरी ग्रामीण भागात त्याची  रस्त्यावर उघड्यावरच विल्हेवाट लावली जाते. हा कचरा ग्रामीण  लोकांच्या जीवावर बेतत आहे.

निपाणी, चिकोडी परिसरात लहान-मोठे दवाखाने आहेत. रुग्णांसाठी वापरण्यात आलेली वैद्यकीय उपकरणे ठरावीक दवाखान्यातून ती वैद्यकीय प्रकल्पाला देऊन आपला परिसर स्वच्छ ठेवला जातो. पण ग्रामीण भागात वैद्यकीय कचरा गावाजवळील रिकाम्या जागेवर अथवा ओढे, नाले, वगळीमध्ये टाकला जातो. ग्रामीण नागरिकांना वैद्यकीय कचर्‍याबाबत जागृती आणि माहिती नसल्याने त्याचा योग्य तो विचार न होता त्याचा गैरवापरही होतो.

दवाखान्यात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप यासह अन्य कचरा उघड्यावरच टाकला जातो. यामध्ये मुले वरील काही साधनांचा खेळण्यासाठी वापर करीत असतात. यातून अनेक अपायकारक घटना घडू शकतात.

ग्रामीण भागातील सरकारी अथवा खासगी दवाखान्यामध्ये प्रसूतीनंतर टाकावू अवयव व अन्य साहित्य उघड्यावरच टाकले जाते. त्यामुळे काही भागात दवाखान्याच्या परिसरात दुर्गंधीचा त्रास होऊ शकतो. वैद्यकीय कचर्‍याची अशीच समस्या राहिल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन शकते.

दोन  वर्षापासून देशपातळीवर स्वच्छता मोहिमेचा उपक्रम शासनाने सुरू केला आहे. यानिमित्ताने राजकीय नेते, समाजसेवी संस्था उपक्रमात सहभागी झाल्या आहेत.पण वैद्यकीय कचर्‍याचा प्रश्‍न तसाच आहे. या मोहिमेंतर्गत वैद्यकीय कचराही उचलण्याची जबाबदारी घेतल्यास हा प्रश्‍न निकालात निघेल.

ग्रामीण भागातील कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने  त्याची जबाबदारी ग्रा.पं.ने घेण्याची गरज आहे. वैद्यकीय घनकचरा, त्याचे दुष्परिणाम, नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबद्दल जागृती, मार्गदर्शन होणे महत्त्वाचे आहे. आरोग्य खात्यानेही गावपातळीवर सर्वच दवाखान्यांना घनकचर्‍याच्या व्यवस्थेबाबत योग्य माहिती देऊन तो कचरा वैद्यकीय घनकचरा प्रकल्पाला देण्यास भाग पाडल्यास वैद्यकीय घनकचर्‍याचे उच्चाटन होईल.

उपक्रम ऐच्छिक असल्याने स्वच्छ भारत उप्रकम ऐच्छिक असल्याने प्रत्येक नागरिकाने दिवसभरातील काही वेळ परिसर स्वच्छेतेसाठी दिला पाहिजे. हे हेरून येथील आयएमए संस्थेच्यावतीने उपक्रम प्रभावी ठरावा यासाठी शहरात वैद्यकीय प्रबोधन करण्यात येत आहे. तरी समाजातील इतर घटकांनी या उपक्रमात सहभागी होणे काळाची गरज असल्याचे आयएमएचे  सदस्य डॉ.चंद्रकांत कुरबेट्टी यांनी दै. ‘पुढारी’ला  सांगितले.