Mon, Mar 25, 2019 09:15होमपेज › Belgaon › ‘जी+3 इमारत’ नावाने योजना, सिव्हिल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा प्रयत्न

पार्किंग समस्येवर शोधला उपाय 

Published On: Jun 03 2018 1:12AM | Last Updated: Jun 02 2018 10:06PMबेळगाव : प्रतिनिधी

वाहन पार्क करण्यासाठी जागा मिळणे शहरातील मोठी समस्या आहे.  महानगरपालिकेमार्फत उपलब्ध दोन व कॅन्टोनमेंट बोर्डचा एक वाहनतळ अपुरा पडतो. या समस्येवर सिव्हिल इंजिनिअरिंग शिकणार्‍यांनी उपाय शोधला आहे. 

तोकड्या व मर्यादित संख्येतील वाहनतळाच्या समस्येवर बहुमजलीचा पर्याय सुचविण्यात आला आहे. यासाठीचा  खर्च नगण्य असेल. यातून समस्या नक्‍की सुटेल, असा दावा या परियोजनेच्या अभ्यासाअंती आराखडा तयार केलेल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. 

जीआयटीमधील अंतिम वर्षात शिकणार्‍या शुभांगी जी., यतीश बी., निहाल अहमद आणि शक्‍ती कुमार बी. यांनी ही योजना तयार केली आहे. त्यांंनी बापट गल्‍लीतील वाहनतळाचा व बाजारपेठेतील पार्किंगचा महिनाभर अभ्यास करून ‘जी+3 इमारत’ या नावाने योजना तयार केली. 93 कार व शंभरहून अधिक दुचाकी पार्कची सोय या इमारतीत होईल, असा त्यांचा दावा आहे. 

महानगरपालिकेडून अनेक वर्षापासून बहुमजली वाहनतळ बांधण्याचा प्रयत्न होतो आहे. पालिकेच्या आठमजली वाहनतळाची योजना प्रत्यक्षात साकारण्यात मुख्य अडचण आहे ती दराची. कोणतीही बांधकाम कंपनी यामुळे काम करण्यास इच्छुक नाही. यामुळे मनपाने बापट गल्‍लीत आठ ऐवजी दोन मजली वाहन तळ बांधण्याचा निर्णय घेतला. 

केवळ सहा कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चात वाहनतळ तयार होऊ शकतो, हे विद्यार्थ्यांनी दाखविले. महानगरपालिकेने वाहनतळाची निर्मिती पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर करून मुदतीच्या बोलीवर वाहनतळ चालविण्यास दिल्यास योजना शून्य खर्चात पूर्ण होऊ शकते, हे यतीश या विद्यार्थ्याने सिध्द केले आहे. अंतिम वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी विविध बांधकाम योजनांसाठी तयार केलेल्या आराखड्याच्या प्रदर्शनात वाहनतळ आराखडा सादर केला होता.  मनपा अधिकार्‍यांनाही योजना सादर करण्यात येणार आहे.