Tue, Mar 26, 2019 01:33होमपेज › Belgaon › एका रात्रीत चक्‍क नालाच बेपत्ता

एका रात्रीत चक्‍क नालाच बेपत्ता

Published On: Jan 22 2018 1:25AM | Last Updated: Jan 22 2018 9:12AMमच्छे : वार्ताहर 

मलप्रभा नदीला जोडणारा नालाच एका रात्रीत बेपत्ता झाल्याची घटना झाडशहापूर गावात घडल्याने शेतकरी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन संबंधितांवर त्वरित कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.  बेळगाव-खानापूर महामार्गावरील झाडशहापूरच्या एका बाजूनी मुंगेत्री नदी तर दुसर्‍या बाजूने नाला असून या नदी, नाल्याला किणये, पिरनवाडी, मच्छे, मजगाव, खादरवाडी येथून पावसाचे पाणी येऊन मिळते. गावच्या दोन्ही बाजूचे नदी-नाले हे पाण्याने तुडूंब भरून वाहत असतात. पावसाळ्यात तर या नदी-नाल्याचे पाणी शेतवडीत जाऊन पिकांचे नुकसान होत असते. अनेक शेतकर्‍यांनी नाल्यावर अतिक्रमणे करून नाल्याची रूंदी कमी केल्याने पाणी पात्राबाहेर पडते. याबद्दल शेतकर्‍यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, फॉरेस्ट अधिकार्‍यांना कळविले तरी अतिक्रमणे सुरूच आहेत.  

झाडशहापूर गावाजवळ नव्याने शेतजमीन घेतलेल्या एका व्यक्‍तीने एका रात्रीत सुमारे 200 मीटर लांबीचा नाला पूर्ण माती टाकून बुजविला असून या नाल्याच्या बाजूला असलेली झाडे,बांबू तोडली आहेत. याबाबत नागरिकांना समजताच भरमाणी नेमाणी गोरल, बाबू परशराम गोरल, सहदेव गोरल या शेतकर्‍यानी संबंधित मालकाला हा नाला का बुजविला, असे विचारताच त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गावातील 100 हून अधिक शेतकर्‍यांनी मालकाला घेराव घातला. यावेळी यल्लाप्पा गोरल, परशराम नंदिहळ्ळकर, मधु नंदिहळ्ळी, लक्ष्मण गोरल यांनी शेतकर्‍यांना घेऊन नाल्यात  ठिय्या मांडला. तसेच याबाबत ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आले.

ग्रामीण सीपीआय नारायणस्वामी  फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वनाधिकारी रमेशही  दाखल झाले व काम थांबविण्यास सांगितले. या घटनेबाबत सोमवार दि.22 रोजी देसूर, ग्रा.पं.चे पीडीओ जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, ग्रा.पं.सदस्य मल्लाप्पा गोरल व ग्रामस्थांबरोबर ग्रामीण सीपीआय नारायणस्वामी चर्चा करणार असल्याचे समजते.