Mon, Aug 19, 2019 13:19होमपेज › Belgaon › महापौरपदासाठी इच्छुकांच्या हालचाली

महापौरपदासाठी इच्छुकांच्या हालचाली

Published On: Feb 01 2018 1:42AM | Last Updated: Jan 31 2018 11:34PMबेळगाव ः प्रतिनिधी

1 मार्च रोजी विद्यमान महापौर-उपमहापौरांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे आणि महापौरपद अनुसूचित जाती-जमाती तर उपमहापौरपदासाठी मागास ‘अ’ महिला आरक्षण जाहीर झाले असल्यामुळे  इच्छुकांत चढाओढ सुरू झाली आहे.

बेळगाव महापालिकेवरील सत्तेपासून मराठी भाषकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न ‘करनाटकी’ सरकारने केला आहे.  महापौर निवडणूक आजी-माजी पालकमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरणार आहे. यामुळेच महापौरपदासाठी इच्छुक दोन उमेदवारांनी स्नेहभोजनाच्या आयोजनातून प्रयत्न चालवले आहेत.

तीन महिन्यांपासून सर्वांच्या नजरा महापौर-उपमहापौर आरक्षणाकडे खिळल्या होत्या. महापालिकेवरील मराठी भाषिकांचे वर्चस्व ‘करनाटकी’ शासनाच्या डोळ्यांत खुपत होते. मराठी गटात अनुसूचित जाती-जमाती सदस्य नसल्याचे पाहून नेमके तेच आरक्षण बेळगाव महापौरपदासाठी जाहीर करण्यात आले. विद्यमान सभागृह काळात शेवटच्या वर्षी मराठी भाषिकांना सत्तेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. उपमहापौर पदासाठी मागास ‘अ’ महिला आरक्षण जाहीर केले. 

महापालिकेत 32 मराठी सदस्य आहेत. शिवाय मराठी गटाकडे चार वर्षे सत्ता आहे. बहुमत असतानाही मराठी भाषिक गटात अनुसूचित जमातीचा एकही सदस्य नाही. महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्यामुळे  मराठी सदस्यांची कोंडी झाली आहे. 

 विरोधी गटात महापौरपदासाठी बसवराज चिकलदिनी, सुचेता गडगुंद्री यांची नावे आघाडीवर आहेत. चिकलदिनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचे तर गडगुद्री या माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे समर्थक आहेत. 

काही वर्षांपासून जारकीहोळी बंधूंनी ‘मनपा’च्या राजकारणात विशेष रस घेतला आहे. मराठी भाषिकांच्या बहुमतामुळे आतापर्यंत त्यांना सत्ता काबीज करता आली नव्हती. यावेळी आयती संधी मिळाली आहे.

जारकीहोळी बंधूंचे मराठी गटातील सदस्यांशी संबंध आहेत. यावेळच्या महापौर निवडणुकीसाठी समर्थकांच्या विजयासाठी जारकीहोळी बंधूंनी चंग बांधला आहे. मराठी सदस्यांच्या पाठिंब्यावर आपलाच समर्थक हमखास महापौर बनणार याची त्यांना खात्री आहे. यामुळेच महापौरपदाच्या दोन उमेदवारांनी मराठी सदस्यांशी संधान  साधले आहे. महापौरपदाच्या पाठिंब्याची चाचपणी करण्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन सुरू झाले आहे. कन्नड-ऊर्दूबरोबरच काही मराठी सदस्यांनाही मेजवानीचे निमंत्रण देण्यात येत आहे.

रविवारी रात्री एका इच्छुक उमेदवाराने मेजवानीचे आयोजन केले होते. काही मराठी सदस्यांना ऐनवेळी निमंत्रण देण्यात आले तर काही सदस्य उपस्थित होते.