Fri, Jul 19, 2019 13:27होमपेज › Belgaon › नागरिकांकडून आलेल्या सूचनांचे पालन करू 

नागरिकांकडून आलेल्या सूचनांचे पालन करू 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

सन 2018-19 सालासाठी निपाणी नगरपालिकेच्यावतीने मांडण्यात येणार्‍या अंदाजपत्रकात नागरिकांकडून आलेल्या सूचनांचे पालन करून, योग्य अशा सर्व कामांचा या अंदाजपत्रकात समावेश केला जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी दिली.

पालिकेत आयोजित अंदाजपत्रक मांडणीपूर्व बैठकीत ते बोलत होते. स्वागत सहा. कार्यकारी अभियंते पी.जे.शेंदुरे यांनी केले. बैठकीत नागरिक व नगरसेवकांनी सूचना मांडल्या. सचिन पोवार यांनी साखरवाडीतील मारुती मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी 50 लाखांची तरतूद करावी तसेच गणेश विसर्जन काळात अन्य महानगरांप्रमाणे कृत्रिम तळ्याची उभारणी करावी अशी मागणी केली. एस.ए.सकट यांनी निपाणीतील चर्च विकासासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा, प्रकाश कोष्टी यांनी लोकमान्य टिळक उद्यानाच्या दुरुस्तीसाठी तरतूद करावी तसेच नगरपालिकेची रुग्णवाहिका सुरू करावी, पत्रकार संघाच्यावतीने अध्यक्ष राजेश शेडगे यांनी पत्रकार भवनाची मागणी केली. वॉर्ड क्र. 6 व सावंत कॉलनीमधील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला. मोहन बुडके यांनी पार्किंग समस्या, अतिक्रमण रोखण्याबाबत उपाययोजना कराव्यात, असा मुद्दा मांडला.

नगरसेवक संजय सांगावकर यांनी छ. संभाजीराजे स्मारकासाठी अतिरिक्‍त 20 लाख रु. व कमळाबाई मोहिते यांच्या स्मारकासाठी 15 लाख रु.ची तरतूद करण्याची मागणी केली. धनाजी निर्मळे यांनी वैयक्‍तिक शौचालय बांधून घेणार्‍या लाभार्थ्यांना 15 ते 20 हजार रु.पर्यंत अनुदान देण्याची तरतूद करण्यास सूचविले. राजेंद्र चव्हाण यांनी राणी लक्ष्मीबाई सुतिकागृहाच्या सुधारणेसाठी रकमेची तरतूद केली जावी, शिवाय शहरातील उद्यानांच्या विकासाकडे व लहान मंदिराच्या जीर्णोध्दाराकडे पालिकेने लक्ष द्यावे तसेच गांधी चौकात म.गांधी यांचा पुतळा उभारावा, असे सांगितले. बाळासाहेब देसाई सरकार यांनी वेदगंगा नदीकाठी घाट बांधावा, उरुस काळात नागरिकांना सुविधा पुरवाव्यात तसेच जिजामाता चौक येथे राजमाता जिजाऊ यांचा पुतळा उभारण्यासाठी तरतूद करावी, असे सांगितले. जुबेर बागवान यांनी राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनासमोर 100 फुटी ध्वजस्तंभासाठी निधी द्यावा, कब्रस्तानची सुधारणा करावी तसेच विठ्ठल व लक्ष्मी मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी निधीची तरतूद करावी असे सांगितले. अनिस मुल्ला, नीता लाटकर, नीता बागडे, विठ्ठल वाघमोडे यांनीही विचार मांडले. 

नगराध्यक्ष गाडीवड्डर म्हणाले, शहरातील 7 उद्यानांच्या निर्मितीसाठी प्रत्येकी 1 कोटी रु. प्रमाणे निधी मंजुरीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शिवाय या बैठकीत आलेल्या सूचनांनुसार येणार्‍या अंदाजपत्रकात  या कामांचे योग्य नियोजन करु व ही सर्व कामे सदर सभागृहाचा कालावधी संपण्याधी पूर्ण करण्यास कटीबध्द राहू. 

यावेळी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, सभापती नजहतपरवीन मुजावर, नगरसेवक रवींद्र चंद्रकुडे, जायेदा बडेघर, डॉ.नंदकिशोर कुंभार, किरण कोकरे, शिरीष कमते, प्रसाद बुरुड, महेश पाटील आदी उपस्थित होते.