Sat, Jul 20, 2019 15:11होमपेज › Belgaon › न्यायालयाचा आज निर्णय

न्यायालयाचा आज निर्णय

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 11:48PMबेळगाव  : प्रतिनिधी

मनपा महापौर-उपमहापौर आरक्षणाला आक्षेप घेऊन न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठामध्ये निकाल लागणार आहे. याकडे बेळगावातील मराठी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. महापौर-उपमहापौर निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये महापौरपद अनुसूचित जमातीकरिता राखीव ठेवण्यात आले असून हे आरक्षण चुकीच्या पद्धतीने जाहीर केल्याचा आरोप सत्ताधारी मराठी गटाने केला आहे. यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. महापौरपद जाहीर करताना रोटेशन पद्धत डावलण्यात आली आहे.

मनपा निवडणूक कायद्याचा भंगदेखील झाला आहे. यामुळे सत्ताधारी मराठी गटावर अन्याय झाला आहे. आरक्षणाबाबत फेरविचार करण्याची याचिका न्यायालयात नगरसेवक अ‍ॅड. रतन मासेकर यांनी दाखल केली आहे. यावर सुनावणी सुरू असून मंगळवारी नगरविकास खात्याचे सचिव, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, विभागीय आयुक्त यांनी उपस्थिती दर्शविली. यानंतर बुधवारी युक्तिवाद केला. युक्तिवादाची पडताळणी शुक्रवारी होणार असून निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापौर-उपमहापौर पदासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू असून मनपाचे राजकारण तापले आहे. न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यास इच्छुकांच्या प्रयत्नावर पाणी फेरले जाणार आहे. यामुळे शुक्रवारी होणार्‍या न्यायालयीन पडताळणीकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.