Thu, Apr 25, 2019 05:33होमपेज › Belgaon › महापौर-उपमहापौर निवडणूक १ मार्चला

महापौर-उपमहापौर निवडणूक १ मार्चला

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 11:55PMबेळगाव : प्रतिनिधी

महापौर-उपमहापौर आरक्षणाबाबत शुक्रवारी नगरविकास खात्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या न्यायालयाकडे चर्चेसाठी मुदत मागितली होती. दरम्यान, सोमवारी झालेल्या सुनावणीप्रसंगी न्यायालयाने अ‍ॅड. रतन मासेकर यांनी दाखल केलेल्या महापौर निवडणूक अंतरिम याचिका रद्दबातल ठरविली. त्यामुळे 1 मार्च रोजी बेळगाव महापौर-उपमहापौर पदांची निवडणूक होण्याचे निश्‍चित झाले आहे. 

सरकारने बेळगाव महापौर-उपमहापौर आरक्षण जाहीर करताना रोटेशन पद्धत आणि मनपा निवडणूक कायद्याचा भंग झाल्याचा आरोप बेळगाव मनपातील सत्ताधारी मराठी गटातर्फे करण्यात आला होता. त्यानंतर नगरसेवक अ‍ॅड. मासेकर यांनी महापौर-उपमहापौर आरक्षणाबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आरक्षण जाहीर करताना मनपा निवडणूक कायद्याचा भंंग झाल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयासमोर मत मांडले होते. त्याचबरोबर निवडणूक लांबणीवर पडावी यासाठीही न्यायालयाकडे अंतरिम याचिकाही दाखल केली होती.

सोमवारी सरकारी वकिलांनी सरकारने महापौर निवडणुकीची अधिसूचना जारी केल्याची माहिती दिली. त्यामुळे न्यायालयाने अंतरिम याचिका रद्द केली. त्यामुळे महापौर निवडणूक स्थगिती मिळवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे 1 मार्च रोजी महापौर-उपमहापौर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे;  मात्र अ‍ॅड. मासेकर यांनी महापौर आरक्षणाबाबत दाखल केलेली मुख्य याचिका न्यायालयात अद्यापही कायम राहणार आहे. तीवर सुनावणी कधी होईल, ही तारीख नंतर निश्‍चित होईल.