Fri, Jul 19, 2019 20:57



होमपेज › Belgaon › अष्टगी जायंट किलर होता होता राहिले

अष्टगी जायंट किलर होता होता राहिले

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 10:22PM



बेळगाव  : प्रतिनिधी

यमकनमर्डी विधानसभा मतदार संघावर गेल्या दहा वर्षा पासून वर्चस्व गाजविणार्‍या काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी निसटता विजय मिळवून हॅट्ट्रिक साधली आहे.  भाजपचे उमेदवार मारुती अष्टगी जायंट किलर होता होता राहिले. सतीश जारकीहोळी 2817 मताधिक्याने विजयी झाले. 

जिल्ह्याच्या राजकारणात जारकीहोळी बंधूंचे चांगलेच वर्चस्व आहे. यामध्ये विशेष करुन मास्टर माईंड म्हणून ओळखल्या जाणार्‍या आ. सतीश जारकीहोळी यांच्या यमकनमर्डी विधानसभा मतदार संघातील निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.  

मतदारसंघात असलेला जनाधार, राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध व पक्षाच्या हायकमांडने राष्ट्रीय राजकारणात दिलेले एआसीसी सदस्यपद. तसेच त्यांच्यावर तेलंगणा राज्य काँग्रेस पालक सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात सतीश जारकीहोळी यांचा मोठा दबदबा निर्माण झाला होता. त्यामुळे ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा अंदाज होता. 

निवडणुकांमध्ये सिध्दरामय्या यांच्या बदामी मतदार संघात व खानापूर मतदारसंघात त्यांनी प्रचार  केला. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील प्रचाराकडे झालेले दुर्लक्ष व मतदारांमध्ये पसरलेली नाराजी आ. सतीश जारकीहोळी यांना महागात पडली आहे. 

जारकीहोळींना मिळालेला जनतेचा कौल त्यांना विचार करण्यास भाग पाडणारा ठरला आहे. 2013 च्या निवडणुकांमध्ये 24,350 मताधिक्याने विजयी झालेल्या जारकीहोळी यांना या निवडणुकीत केवळ 2,817  अधिक मतांवर समाधान मानावे लागले. मागील निवडणुुकीत 70,726 मते घेतली होती. या निवडणुकीत त्यांना 73,512 मते मिळाली आहेत. भाजपच्या मारुती अष्टगी यांनी  या निवडणुकीत 70,662 मते घेऊन जारकीहोळी यांनी चागंलीच टक्‍कर दिली. मागील निवडणुकीत त्यांनी 46,376 मते घेतली होती. 

मतदार संघात असलेले पीए राज, स्थानिक नेत्यांबद्दल असलेली नाराजी व सर्वसामान्य मतदारांशी असलेला संवांदाचा अभाव यामुळेच मतांमध्ये घट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गत निवडणुकांपेक्षा या निवडणुकीत 30 ते 35 हजार मताधिक्य घेऊन जारकीहोळी विजयी होतील, असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र अटीतटीची लढत झाल्याने  ही गणिते चुकली आहेत.  अष्टगी यांनी त्यांना दिलेली टक्कर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. 

निजद उमेदवार शंकर गस्ती यांना 1837 मते मिळली आहेत. कर्नाटक जनता पक्षाचे उमेदवार डॉ. यल्‍लाप्पा नाईक 1299, अपक्ष उमेदवार भीमप्पा नाईक यांनी 520 मते घेतली.  1702 मतदारांनी नोटाला मत दिले.