Thu, Apr 25, 2019 03:51होमपेज › Belgaon › मराठी बाणा हा सीमालढ्याचा प्राण

मराठी बाणा हा सीमालढ्याचा प्राण

Published On: Feb 09 2018 1:59AM | Last Updated: Feb 08 2018 10:43PMबेळगाव : प्रतिनिधी

मराठी बाणा सीमालढ्याचा प्राण असून, सीमाभागातील मराठी जनतेच्या सामाजिक-राजकीय लढ्यात राक्षसी प्रवृत्तीपासून सावध राहावे लागेल, अशा भावना विविध नेत्यांनी व्यक्‍त केल्या.

गुरुवारी सकाळी बेळगावात हुतात्मा दिन कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबईत 1969 साली सीमाप्रश्‍नासाठी आंदोलन झाले होते. पोलिसांच्या गोळीबारात शिवसेनेच्या 67 शिवसैनिकांनी हौतात्म्ये पत्करले होते. त्या हुतात्म्यांना बेळगाव आणि सीमाभागातील मराठी जनतेच्या वतीने गुुरुवारी अभिवादन करण्यात आले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा शिवसेनाप्रमुख संजय पवार म्हणाले, बेळगाव सीमाभागातील मराठी जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी निरंतर लढा देत आहे. सीमावासीयांच्या लढ्याला शिवसेनेची नेहमीच साथ आहे.  सीमा आंदोलनातील हुताम्यांच्या कुटुंबीयांची काळजी घ्यावीच लागेल. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींशी चर्चा केली जाईल.हुतात्म्यांच्या वारसदारांना देण्यात येणारी मदत आणि सीमालढ्याच्या आगामी व्यूहरचनेसाठी म. ए. समिती नेत्यांची उद्धवजींसोबत भेट घडवून देऊ.

सम्राट अशोक चौकात अभिवादनासाठी पवार यांच्यासह शिवसेना चंदगड संपर्कप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, तालुका म. ए. समिती अध्यक्ष निंगोजी हुदार, माजी आमदार मनोहर किणेकर, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, बेळगाव सीमाभाग शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर  आदी उपस्थित होते. यावेळी दीपक दळवी म्हणाले, सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात असताना सीमाभागातील मराठी भाषिक गुलामगिरीत जगत आहेत, याची जाणीव ठेऊन महाराष्ट्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने सीमावासीयांना ताकद द्यावी.